VIDEO : सामूहिक विवाह सोहळ्यात २४ जोडपी विवाहबद्ध, शिरपूर येथील गवळी समाजबांधवांचा स्तुत्य उपक्रम
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2018 16:06 IST2018-04-22T16:06:31+5:302018-04-22T16:06:31+5:30
गेल्या ४ वर्षांपासून गवळी समाजाच्यावतीने येथे सुरू करण्यात आलेली सामुहिक विवाह सोहळ्याची परंपरा कायम असून, २२ एप्रिल २०१८ रोजी २४ जोडपी विवाहबद्ध झाली आहेत.

VIDEO : सामूहिक विवाह सोहळ्यात २४ जोडपी विवाहबद्ध, शिरपूर येथील गवळी समाजबांधवांचा स्तुत्य उपक्रम
वाशिम - गेल्या ४ वर्षांपासून गवळी समाजाच्यावतीने येथे सुरू करण्यात आलेली सामुहिक विवाह सोहळ्याची परंपरा कायम असून, २२ एप्रिल २०१८ रोजी २४ जोडपी विवाहबद्ध झाली आहेत.
मागील काही वर्षांपासून लग्न सोहळ्यात झगमगाट, बँण्डबॉजा, खानावळी, आहेर आदिंवर खर्च करण्याची प्रथाच रुढ झाली आहे. शिरपूर जैन येथील गवळी समाजाने मात्र या प्रथेला फाटा देऊन सामुहिक विवाह सोहळ्याची आदर्श पद्धती अवलंबली आहे. गेल्या ४ वर्षांपासून या ठिकाणी गवळी समाजाच्यावतीने सामूहिक विवाह सोहळ्यांचे आयोजन केले जाते. यावर्षीदेखील या सोहळ्यात २२ एप्रिल रोजीच २४ जोडपी विवाहबद्ध झाली आहेत. २४ वधूंना प्रत्येकी १६ तोळे चांदी देण्यात आली. सोहळ्याच्या यशस्वितेसाठी सर्व गवळी समाजबांधवांनी परिश्रम घेतले. शिरपूर येथील शादिखाना परिसरात हा विवाह सोहळा पार पडला. कारंजा, मेहकर, जालना, लोणार, वाशिम, अंबाजोगाई, सुरकुंडी, मंगरूळपीर येथील वर-वधू विवाह बंधनात अडकले. या सोहळ्याला जवळपास १५ हजार नागरिकांची उपस्थिती होती, असा दावा आयोजकांनी केला.
या सोहळ्यात सहभागी जोडप्यांना दरवर्षीप्रमाणे संसारोपयोगी साहित्य वाटप करण्यात आले. वºहाडी म्हणून येणाºया पाहुण्यांसह आमंत्रित हजारो लोकांसाठी भोजन व्यवस्था केली होती. गवळी समाजात कामगारांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे या समाजात लग्नावर अधिक खर्च करणे परवडणारे नाही. ही समस्या लक्षात घेऊन समाजबांधवांचा खर्च वाचविण्यासह एक आदर्श निर्माण करण्याच्या उद्देशाने काही सुज्ञ बांधवांनी समाजापुढे सामूहिक विवाह सोहळ्याची संकल्पना मांडली. या संकल्पनेला गवळी समाजाकडून प्रतिसाद मिळाला आणि एक आदर्श प्रथा या समाजात पडली आहे. गेल्या चार वर्षांत या सामूहिक विवाह सोहळ्यांत १२० जोडपी विवाहबद्ध झाली आहेत.
दरम्यान, या सोहळ्याला उपस्थित असलेले माजी जि.प. सभापती डॉ. श्याम गाभणे म्हणाले की, मागील चार वर्षांपासून शिरपूर येथील गवळी समाजाच्यावतीने सामुहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात येत आहे, ही बाब फार कौतुकास्पद आहे. यापुढे गावातील इतर समाजानेही एकदा सामुहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करावे. समाजकार्यासाठी आपण योग्य ती मदत देण्यासाठी सदैव तत्पर राहू, अशी ग्वाही डॉ. श्याम गाभणे यांनी दिली.