एसटी बस उलटली अन् चोरी फसली
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2018 07:11 IST2018-11-03T03:39:19+5:302018-11-03T07:11:03+5:30
महामार्गाच्या कामामुळे उधळला डाव; अकोला आगाराची बस चोरण्याचा प्रयत्न

एसटी बस उलटली अन् चोरी फसली
वाशिम : अकोला-२ या आगाराची एसटी महामंडळाची बस चोरण्याचा प्रयत्न गुरुवारी रात्री फसला. महामार्गाच्या कामासाठी सुरू असलेल्या खोदकामात बस कलंडल्याने चोरट्याला ती तिथेच टाकून पलायन करावे लागले.
मंगरुळपीरनजिकच्या गोलवाडी येथे शुक्रवारी सकाळी हा प्रकार उघडकीस आला. अकोला-२ आगारात रात्री उभी असलेली एमएच-१४, ०६४२ क्रमांकाची एसटी बस अज्ञात चोरट्याने मंगरुळपीर येथे आणली. त्यानंतर ती वाशिमकडे नेण्याचा त्याचा प्रयत्न होता. मंगरुळपीर-वाशिम राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू आहे. त्याअंतर्गत गोलवाडीनजिक खोदकाम करण्यात आले आहे. याच ठिकाणाहून चोरट्याने वेगाने बस चालवत समोरच्या वाहनास ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला. त्या वेळी नियंत्रण सुटल्याने ही बस रस्त्याच्या कडेला उलटली. त्यामुळे बस सोडून चोरट्याला पळ काढावा लागला.
बस पुन्हा आगारात
शक्रवारी सकाळी मंगरुळपीर आगारात याबाबत माहिती मिळाली. त्यानंतर विभागीय नियंत्रकांसह इतर अधिकाऱ्यांनी मंगरुळपीर येथे येऊन याबाबत चौकशी केली. तसेच के्रनच्या बाहेर काढून बस मंगरुळपीर आगारात नेण्यात आली. याप्रकरणी संबंधित कर्मचाºयांची चौकशी करण्यात येत आहे.