पीक नुकसानीचे पंचनामे तातडीने पूर्ण करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2021 04:50 IST2021-09-10T04:50:22+5:302021-09-10T04:50:22+5:30

वाशिम : जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे तातडीने पूर्ण करावेत. एकाही नुकसानग्रस्त शेतकऱ्याच्या शेतपिकाचे नुकसान पंचनाम्यातून सुटणार नाही, याची ...

Complete crop loss inquiries immediately | पीक नुकसानीचे पंचनामे तातडीने पूर्ण करा

पीक नुकसानीचे पंचनामे तातडीने पूर्ण करा

वाशिम : जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे तातडीने पूर्ण करावेत. एकाही नुकसानग्रस्त शेतकऱ्याच्या शेतपिकाचे नुकसान पंचनाम्यातून सुटणार नाही, याची दक्षता घेण्याच्या सूचना पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिल्या. जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे झालेले नुकसान आणि गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी ९ सप्टेंबर रोजी दूरदृश्य प्रणालीद्वारे झालेल्या बैठकीत ते बोलत होते.

या वेळी जिल्हाधिकारी शण्मुगराजन एस., पोलीस अधीक्षक वसंत परदेशी, जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक बोंद्रे, निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे, जिल्हा परिषद लघुसिंचन विभागाचे कार्यकारी अभियंता मापारी, जलसंधारण विभागाचे अतुल साळुंखे यांची प्रमुख उपस्थिती होती.

पालकमंत्री देसाई म्हणाले, जिल्ह्यात गेल्या दोन-तीन दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस झाला असून कारंजा तालुक्यासह मानोरा तालुक्यातील काही गावांमध्ये अतिवृष्टी झाली आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पाणी जमा होऊन पिकांचे नुकसान झाल्याचे दिसून येत आहे. या सर्व नुकसानीचे पंचनामे तातडीने पूर्ण करावेत. तलाठी, ग्रामसेवक व कृषी सहायक यांना पंचनामे काळजीपूर्वक करण्याच्या सूचना द्याव्यात. नुकसानग्रस्त शेतकऱ्याच्या प्रत्येक नुकसानीचा समावेश पंचनाम्यामध्ये होणे आवश्यक आहे. तसेच घरांची पडझड, पुरामध्ये वाहून गेलेल्या व्यक्तींची माहिती संकलित करून आवश्यक मदत उपलब्ध करून देण्याची कार्यवाही गतिमान करण्याच्या सूचनाही पालकमंत्र्यांनी या वेळी दिल्या.

Web Title: Complete crop loss inquiries immediately