पोलिसांत तक्रार दिल्याचा राग; डोक्यावर मारली कुऱ्हाड!

By सुनील काकडे | Updated: June 21, 2024 21:28 IST2024-06-21T21:28:33+5:302024-06-21T21:28:41+5:30

नंधाना येथील घटना : आरोपीवर गुन्हा दाखल

Anger at reporting to the police; Ax hit on the head! | पोलिसांत तक्रार दिल्याचा राग; डोक्यावर मारली कुऱ्हाड!

पोलिसांत तक्रार दिल्याचा राग; डोक्यावर मारली कुऱ्हाड!

वाशिम : जिल्ह्यातील शिरपूर पोलिस स्टेशनच्या हद्दीतील नंधाना येथे भागवत पंढरी बाजड नामक व्यक्तीने त्याच्या विरोधात पोलिसांत तक्रार दिल्याचा राग मनात धरून रमेश पंढरी बाजड याच्या डोक्यात लोखंडी कुऱ्हाड मारून त्यास जखमी केले. याप्रकरणी दाखल फिर्यादीवरून पोलिसांनी १९ जून रोजी रात्री उशिरा आरोपीवर गुन्हा दाखल केला.

पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार, १८ जून रोजी भागवत पंढरी बाजड याने शेतातील गोठा जाळल्याची तक्रार भगवान नारायण बाजड यांनी शिरपूर पोलिसांत दाखल केली होती. त्यामुळे संतापाच्या भरात १९ जून रोजी रात्री ११ वाजताच्या सुमारास भागवत बाजडने नारायण बाजड यांच्या घरी येवून वाद घातला. यावेळी त्यांचा पुतण्या रमेश बाजड तिथे हजर होता. रागाच्या भरात भागवत बाजडने हाती असलेली कुऱ्हाड रमेश बाजडच्या डोक्यात मारली. या घटनेत तो गंभीर जखमी झाला. अशा आशयाच्या फिर्यादीवरून शिरपूर पोलिसांनी नमूद आरोपीवर भादंविचे कलम ३०७, ५०४, ५०६ अन्वये गुन्हा दाखल केला.
 

Web Title: Anger at reporting to the police; Ax hit on the head!