आदिवासीबहुल खैरखेडा अजूनही मूलभूत सुविधांच्या प्रतीक्षेत

By Admin | Updated: September 30, 2015 01:28 IST2015-09-30T01:28:30+5:302015-09-30T01:28:30+5:30

अंत्यसंस्कार उघड्यावर ; रस्ते, पाणी, आरोग्याच्या सुविधाच नाहीत.

Ad-tribal Khairkheda is still waiting for the basic amenities | आदिवासीबहुल खैरखेडा अजूनही मूलभूत सुविधांच्या प्रतीक्षेत

आदिवासीबहुल खैरखेडा अजूनही मूलभूत सुविधांच्या प्रतीक्षेत

यशवंत हिवराळे /राजुरा (जि. वाशिम ) : आदिवासीबहुल खैरखेडा गाव विकासापासून कोसोदूर असून, ग्रामस्थ अद्याप मूलभूत सुविधापासून वंचित आहेत.
आदिवासीबहुल लोकवस्ती असलेल्या खैरखेडा गावात रस्ते, पाणी आणि आरोग्यासारख्या मूलभूत सुविधांचा आजही अभाव आहे. गत काही वर्षांचा अपवाद वगळता या गावात पावसाळय़ात तसेच उन्हाळय़ातही सुस्थितीत दुचाकी वाहने चालविण्यायोग्य रस्ता नाही. नदी, नाल्यातील ज्या डोहावर महिला धुणे धुतात, गुरेढोरे पाणी पितात, चक्क त्याच दूषित पाण्याचा वापर पिण्यासाठी करावा लागत आहे. बहुधा गावात एकही सार्वजनिक, खासगी विहीर अथवा कूपनलिका नाही. गावात एकही डॉक्टर नाही. हे गाव किन्हीराजा प्राथमिक आरोग्य केंद्राशी संलग्न असून, हे अंतर जवळपास ३0 कि.मी. आहे. काही डॉक्टर याचा फायदा घेत रुग्णांची लुबाडणूक करीत आहेत. आयुष्यभर मूलभूत सुविधा तरी मिळाव्या, यासाठी सतत संघर्ष करावा लागणार्‍या येथील ग्रामस्थांची मरणानंतरही यातनेतून सुटका होत नाही.
येथील स्मशानभूमीत कोणत्याही प्रकारच्या सुविधा उपलब्ध नसल्यामुळे पार्थिवांवर अंतिम संस्कार करताना अनेक अडचणींचा सामना गावकर्‍यांना करावा लागतो. येथील स्मशानभूमीत शेडच उपलब्ध नाही. परिणामी ऊन, वारा आणि पावसात मृतांवर अंतिम संस्कार करावे लागत असल्याने मरणानंतरही समस्यांच्या जोखडातून ग्रामस्थांची सुटका होत नसल्याची विदारक अवस्था आहे. पावसाळा व हिवाळय़ाच्या दिवसांत मिळेल त्या ठिकाणी अंतिम संस्कार उघड्यावरच केल्याशिवाय गत्यंतर नाही. पावसाळ्यात तर पाउस उघडण्याची वाट पाहावी लागते. येथील व्यक्तीचे मरणही सुसहय़ नाही. स्मशानभूमीत टिन शेड उभारून जनतेची गैरसोय एकही लोकप्रतिनिधी दूर करू शकली नाही, ही खैरखेडा ग्रामस्थांची शोकांतिका ठरत आहे.

Web Title: Ad-tribal Khairkheda is still waiting for the basic amenities