मॅट्रिमोनियल साइट्सवरील पुरुष अन् सोशल मीडिया युजर्सची गुंतवणूक करायला लावून कोट्यवधींची फसवणूक; आंतरराष्ट्रीय टोळीतील ७ जणांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2026 13:48 IST2026-01-07T13:48:21+5:302026-01-07T13:48:58+5:30
देशभरातील ५१ गुन्हे उघडकीस आले असून फसवणुकीची रक्कम २०० कोटींच्या घरात असल्याची माहिती मीरा भाईंदर वसई विरारचे पोलीस आयुक्त निकेत कौशिक यांनी दिली. ह्यात दुबई आणि चायनीज कनेक्शन समोर आले आहे.

मॅट्रिमोनियल साइट्सवरील पुरुष अन् सोशल मीडिया युजर्सची गुंतवणूक करायला लावून कोट्यवधींची फसवणूक; आंतरराष्ट्रीय टोळीतील ७ जणांना अटक
मीरारोड - लग्न जुळणाऱ्या संकेत स्थळांवरच्या पुरुषांना जाळ्यात ओढून तसेच सोशल मीडियावरील आमिष दाखवणाऱ्या जाहिराती द्वारे लोकांना गुंतवणूक करायला लावले जाते. त्यांच्या गुंतवणुकीची रक्कम सामान्य लोकांच्या नावे अडीज टक्के कमिशन देण्याच्या आमिषाने खाती उघडून त्यात वळती केली. त्या खात्यातील रक्कम काढून नंतर ती फॉरेक्स व गोल्ड ट्रेडिंग माध्यमातून डॉलर मध्ये करून फसवणाऱ्या आंतराष्ट्रीय टोळीतील ७ जणांना मीरारोडच्या गुन्हे शाखेने अटक केली आहे. देशभरातील ५१ गुन्हे उघडकीस आले असून फसवणुकीची रक्कम २०० कोटींच्या घरात असल्याची माहिती मीरा भाईंदर वसई विरारचे पोलीस आयुक्त निकेत कौशिक यांनी दिली. ह्यात दुबई आणि चायनीज कनेक्शन समोर आले आहे.
गुन्हे शाखा ४ चे पोलीस निरीक्षक प्रमोद बडाख व पथकाने मुंबई - अहमदाबाद महामार्गावर शिवसाई रेसिडन्सी लॉज वर छापा मारून रोशनकुमार सिथारामा शेट्टी, साबिर मोहम्मद खान, सनद संजीव दास, राहुलकुमार उर्फकैलाश राकेशकुमार व आमिर करम शेर खान ह्यांना पकडले होते. हे आरोपी सदर हॉटेल मधून ऑनलाईन फसवणूक करून मिळवलेले पैसे हे स्वतःच्या बँक खात्यात घेऊन गैरव्यवहार करत असल्याचे आढळून आले होते. चौकशीत अभिषेक अनिल नारकर ऊर्फ गोपल व मोहम्मद रशिद फकीर मोहम्मद बलोच ऊर्फ लक्की यांना अटक करण्यात आली.
आरोपींच्या चौकशीत हे आंतरराष्ट्रीय रॅकेट उघडकीस आले. लग्नजुळणाऱ्या संकेतस्थळावर नोंदणी करणाऱ्या पुरुषांशी तरुणी - महिला कॉल वरून संपर्क करून जवळीक साधत. नंतर त्यांना बनावट शेअर ऍप मध्ये भरपूर फायद्याचे आमिष दाखवून गुंतवणूक करायला लावायच्या. शिवाय सोशल मीडियाच्या अश्याच आमिषाच्या जाहिराती द्वारे पण लोकांना गुंतवणूक करायला लावतात. त्यासाठी दिली जाणारी बँक खाती हि सामान्य लोकांना खाते वापरण्यास देण्यासाठी व्यवहाराच्या अडीज टक्के कमिशनचे आमिष दाखवून उघडली गेली आहेत. तर ऍप मध्ये चांगला फायदा दिसतो मात्र ती रक्कम काढताच येत नाही. फसवणुकीची रक्कम बँक खात्यातून फिरवाफिरवी करून नंतर ती क्रिप्टो करन्सी ऍप माध्यमातून डॉलर मध्ये वळती केली जाते.
क्रिप्टो द्वारे डॉलर मध्ये पैसे वळते करणारे दुबईतील काही भारतीय नागरिक असून चीनच्या लोकांचा सुद्धा ह्यात सहभाग आहे. सायबर फसवणुकीची रक्कम हि लाटण्यासाठी सामान्य लोकांना अडीज टक्के मोबदला देण्याचे आमिष दाखवून त्यांच्या नावे बँक खाती उघडली जातात. त्या बँक खात्यासाठी दिलेला मोबाईल क्रमांक हा आरोपी स्वतः कडे ठेवत. ज्याच्या खात्यात मोठी रक्कम येणार आहे त्याला बंदिस्त ठेऊन खात्यात रक्कम आली कि लगेच ओटीपी द्वारे अन्यत्र वळती करायचे. पोलिसांनी अश्या खातेदारांना पण आरोपी केले आहे. अश्या प्रकारे २०० कोटी रुपयांची फसवणूक देशभरातील नागरिकांची केली गेली आहे. आता पर्यंत देशाच्या विविध भागातील ५१ गुन्हे उघडकीस आले आहेत. तर आणखी सुमारे ४५० तक्रारींची छाननी गुन्हे शाखा करत आहे.
गुजरातच्या एका व्यक्तीची १२ कोटी रुपयांना तर उत्तर भारतातील एकाची १० कोटी रुपयांना फसवणूक केली गेली आहे. गुन्हे शाखेच्या ताब्यात असलेल्या ह्या आरोपींचा ताबा घेण्यास व माहितीसाठी देशभरातील पोलीस मीरारोड मध्ये येत आहेत. कारण त्यांच्या त्यांच्या भागातील गुन्ह्यातील आरोपी असल्याने पोलीस त्यांना त्यांच्या ताब्यात घेणार आहेत.