Crime: भाचीचा लग्नासाठी तगादा अन् मामा संतापला; धावत्या रेल्वेतून ढकलले!
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2025 15:34 IST2025-11-20T15:31:36+5:302025-11-20T15:34:37+5:30
नालासोपारा: मामाच्या प्रेमात पडलेल्या अल्पवयीन मुलीने घर सोडले आणि थेट वसईत मामाच्या घरात पोहोचली. त्यानंतर तिने मामाकडे लग्नाचा तगादा लावत असल्याने मामाने तिला धावत्या लोकलमधून ढकलून तिची हत्या केल्याचे तपासात उघडकीस आले.

Crime: भाचीचा लग्नासाठी तगादा अन् मामा संतापला; धावत्या रेल्वेतून ढकलले!
नालासोपारा: मामाच्या प्रेमात पडलेल्या अल्पवयीन मुलीने घर सोडले आणि थेट वसईत मामाच्या घरात पोहोचली. त्यानंतर तिने मामाकडे लग्नाचा तगादा लावत असल्याने मामाने तिला धावत्या लोकलमधून ढकलून तिची हत्या केल्याचे तपासात उघडकीस आले.
मृत अल्पवयीन मुलगी मूळची मुंबईच्या मानखुर्द येथे राहणारी आहे. तिचा २८ वर्षीय मामा वसईत राहतो. त्या दोघांचे प्रेमसंबंध होते. मामाशी लग्न करण्यासाठी तिने शनिवारी घर सोडले आणि वालीव गावराई पाडामधील ओमसाई चाळीत आपल्या मामाकडे राहण्यास आली होती. मुलगी अचानक बेपत्ता झाल्याने तिच्या आईने वालीव पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. या तक्रारीवरून पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल केला होता.
प्रत्यक्षदर्शीनी दिले पोलिसांच्या ताब्यात
आरोपी मामा मुलीला सोमवारी भाईंदरवरून नालासोपारा येथे लोकलने घेऊन निघाला होता. लोकल नायगाव भाईंदरदरम्यान पोहचताच मामाने भाचीला चालत्या लोकलमधून ढकलून दिले. यात तिचा मृत्यू झाला. ट्रेनमधील प्रवाशाने ही घटना प्रत्यक्ष पाहिली. तिच्या मामाने तिला धक्का दिल्याचे त्याने सांगितले. ट्रेनमधील अन्य प्रवाशांनी पकडून त्याला रेल्वे पोलिसांच्या ताब्यात दिले.
वालीव पोलिसांत गुन्हा दाखल
सुरुवातीला वसई रेल्वे पोलिस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली होती. त्यानंतर पुढील चौकशीसाठी हे प्रकरण वालीव पोलिसांकडे वर्ग करण्यात आले. आरोपीचे त्याच्या भाचीसोबत प्रेमसंबंध होते. तिने त्याच्याकडे लग्नाचा तगादा लावला होता. त्यामुळे तिचा काटा काढण्यासाठी त्याने तिला धावत्या ट्रेनमधून ढकलून दिले, अशी माहिती वालीवचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक दिलीप घुगे यांनी दिली. आरोपी विरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी खासगी कंपनीत सुरक्षा रक्षक म्हणून काम करतो.