जव्हारच्या रेशनिंग विभागात काळेबेरे ?

By Admin | Updated: January 4, 2016 01:16 IST2016-01-04T01:16:50+5:302016-01-04T01:16:50+5:30

बोगस शिधापत्रिका व शिधापत्रिका वितरणात अनियमितता, पुरवठा विभागातील निरीक्षक, कारकून यांच्याकडून शिधापत्रिकाधारकांना जाणूनबुजून त्रास देणे

Kalebere in the rationing section of Jawhar? | जव्हारच्या रेशनिंग विभागात काळेबेरे ?

जव्हारच्या रेशनिंग विभागात काळेबेरे ?

जव्हार : बोगस शिधापत्रिका व शिधापत्रिका वितरणात अनियमितता, पुरवठा विभागातील निरीक्षक, कारकून यांच्याकडून शिधापत्रिकाधारकांना जाणूनबुजून त्रास देणे, विलंब लावणे असे प्रकार झाल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर अन्नपुरवठा विभागाकडून कठोर कारवाई करण्याचे आदेश असतानाही जव्हारमध्ये तसे प्रकार सुरू आहेत. तहसील पुरवठा विभागात आदिवासींच्या अशिक्षितपणाचा फायदा घेत शिधावाटप व शिधापत्रिका वितरणात मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार होत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत.
आदिवासीबहुल जव्हार तालुक्यात १ लाख ३० हजार लोकसंख्या आहे. यापैकी २३ हजार २७८ एवढी कुटुंबेही अंत्योदय, बीपीएल, एपीएलचे शिधापत्रिका कार्डधारक लाभार्थी असून त्यांना रेशनिंग कार्डमध्ये नाव नोंदविणे, कार्ड विभक्त करणे, फाटलेली व जीर्ण झालेली शिधापत्रिका बदलून घेणे, शिधापत्रिकेत नाव लावणे किंवा नाव कमी करणे, अशा विविध कामांकरिता तहसील पुरवठा विभागात येत आहेत. मात्र, या कार्डधारकांनी पुरवठा विभागात अर्ज करून महिने उलटूनही कामे वेळेत होत नसल्याची नाराजी आहे.
तसेच लहानसहान कामासाठी वारंवार हेलपाटे मारूनही वेळेत कामे होत नसल्याची नाराजी शिधापत्रिकाधारक करीत आहेत. तर, अनेकांनी रेशनिंग कार्ड मिळण्यासाठी केलेले अर्ज पुरवठा विभागातून गहाळ होत आहेत.
येथील तसेच शिधापत्रिकावाटप, वेगवेगळ्या कामांसाठी अनियमितपणा असल्याने कार्डधारकांची मोठी हेळसांड होत आहे. ही होणारी आदिवासी नागरिकांची पिळवणूक थांबावावी व संबंधित अधिकारी, कर्मचारी यांच्यावर कारवाईची मागणी होत आहे.

Web Title: Kalebere in the rationing section of Jawhar?