महालक्ष्मीची यात्रा आजपासून

By Admin | Updated: April 22, 2016 01:47 IST2016-04-22T01:47:40+5:302016-04-22T01:47:40+5:30

डहाणू तालुक्यातील चारोटी जवळ मुंबई-अहमदाबाद महामार्गावर विवळवेढे येथील श्री महालक्ष्मी देवीची यात्रा शुक्रवारपासून सुरू होत आहे.

Journey to Mahalaxmi today | महालक्ष्मीची यात्रा आजपासून

महालक्ष्मीची यात्रा आजपासून

कासा : डहाणू तालुक्यातील चारोटी जवळ मुंबई-अहमदाबाद महामार्गावर विवळवेढे येथील श्री महालक्ष्मी देवीची यात्रा शुक्रवारपासून सुरू होत आहे. सतत पंधरा दिवस चालणाऱ्या यात्रेसाठी भाविकांना पुरवावयाच्या सोयीसुविधा व सुरक्षतेची जय्यत तयारी झाली असल्याची माहिती श्री महालक्ष्मी ट्रस्टचे उपाध्यक्ष संतोष देशमुख व सेक्रेटरी वसंत सातवी यांनी दिली.
वर्षभरात या देवीचे बारसी, नवरात्र, यात्रा आदी निरनिराळे उत्सव होतात. चैत्र महिन्यात पौर्णिमेपासून पंधरा दिवसाची यात्रा भरते यात्रेत मुंबईसह पालघर व ठाणे जिल्ह्याातून व गुजरात राज्यातून लाखो भाविक येतात. यात्रेदरम्यान चैत्रपौर्णिमेला पहिला होम व त्यानंतर अष्टमीला दुसरा होम असतो. देवीवर आदिवासी समाजाची मोठी श्रद्धा असून आदिवासी समाजाबरोबरच कुणबी, मांगेला, गुजराती आदी समाजाचे भाविक देवीला आपली कुलस्वामीनी मानतात. मंदिरात पुजारी हे सातवी कुटूंबातील आदिवासी समाजाचे आहेत.
आख्यायिका अशी की, कोल्हापूरच्या या महालक्ष्मीला गुजरातमध्ये वास्तव करण्याची इच्छा झाली असता वाटेत विवळवेढे डोंगरदऱ्यातून जात असतांना विश्रांतीची गरज भासू लागली व विश्रांतीसाठी देवी मुसल्या डोंगराच्या शिखरावर गेली व येथील कान्हा ठाकूर नावाच्या भक्तास देवीने स्वप्नात दृष्टांत दिला व पूजा करण्यास सांगितले व कान्हा ठाकूर मोठ्या श्रद्धेने रोज देवीची डोंगरावर जाऊन पूजा करू लागले आणि पुढे महालक्ष्मी देवी येथेच स्थायिक झाली असे महालक्ष्मी देवीच्या प्रसिद्ध केलेल्या पुस्तकात वर्णन करण्यात आले आहे.
प्रसिद्ध महालक्ष्मी मातेचे मूळ मंदिर तिथल्याच एका डोंगरावर आहे. परंतु तेथे जाणारी वाट अत्यंत अडचणीची व धोकादायक असल्याने देवीचे पुजारी व भाविक यांच्या सहकार्याने देवीचे मंदिर डोंगराच्या पायथ्याशी बांधण्यात आले. परंतु नंतर मात्र दानशूर भाविक नारायण जावरे यांच्या प्रयत्नाने देवीचे मंदिर मुळ वास्तव असलेल्या डोंगरावरही सुंदर बांधले आहे. त्यास महालक्ष्मी गड असे ओळखले जाते.
पुजारी चैत्रशुद्ध पौर्णिमेला पहिल्या होमाच्या दिवशी मध्यरात्री १२ वा. ध्वज, पूजेचे साहित्य, नारळ घेऊन वेगाने पायथ्याच्या मंदिरापासून धावत निघतो व तीन मैलाचा रस्ता कापून ३ वा. डोंगरावर चढतो तेथे तुपाचा दिवा लावून ध्वज फडकावतो आणि सकाळी परत येतो. ६०० फुटावर ध्वज लावतांना त्याच्या अंगात देवी संचारते असे म्हणतात. (वार्ताहर)

Web Title: Journey to Mahalaxmi today