विकासात अडसर ठरलेल्या वृक्षांवर संक्रांत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2020 06:00 AM2020-01-22T06:00:00+5:302020-01-22T06:00:10+5:30

मानवाला शुद्ध ऑक्सिजन पुरविण्यासोबतच वृक्ष पर्यावरणात मोलाची भूमिका बजावतात. जिल्ह्याच्या चहूबाजूने मोठी वनसंपदा आहे. मात्र, मागील पाच वर्षांपासून सुरू असलेल्या जीवघेण्या विकासकामांमुळे वनसंपदेवरच घाला घातला जात आहे. बुटीबोरी-तुळजापूर मार्गाचे सिमेंटीकरण आणि रुंदीकरण पूर्णत्वास गेले. या मार्गाच्या बांधकामावेळीही हजारांवर वृक्षांची कत्तल करण्यात आली.

Transmitted to trees that have been impeded by development | विकासात अडसर ठरलेल्या वृक्षांवर संक्रांत

विकासात अडसर ठरलेल्या वृक्षांवर संक्रांत

Next
ठळक मुद्देसेवाग्राम ते आष्टा फाटा : हिरवळीअभावी मार्ग ओसाड; पर्यावरणप्रेमीत व्यक्त होतोय संताप

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : विविध योजनांच्या नावाखाली वृक्षलागवडीचा देखावा आणि दुसरीकडे विकासकामांत अडसर ठरणाऱ्या डेरेदार वृक्षांची बेसुमार तोड, असा उफराटा प्रकार तत्कालीन सरकारच्या काळापासून जिल्ह्यात सुरू आहे. यामुळे पर्यावरणप्रेमींत संतापाची लाट आहे.
सेवाग्राम ते आष्टा फाट्यापर्यंतच्या रस्त्याचे रुंदीकरण आणि बांधकाम केले जात आहे. हा रस्ता वर्धा-हिंगणघाट मार्गाला जोडला जाणार आहे. या रस्त्याच्या बांधकामाचा कंत्राट एसीसी कंपनीला मिळाला आहे. सेवाग्राम ते आष्टा फाट्यापर्यंत यापूर्वी दुतर्फा असलेल्या वृक्षराजीमुळे चांगली हिरवळ दाटलेली होती. रस्ता बांधकामात अडसर ठरल्याने ५० ते १०० वर्षांपूर्वीच्या विविध प्रजातींच्या हजारावर डेरेदार वृक्षांची कत्तल करण्यात आली आहे. या मार्गाने गेले असता दुतर्फा तोडलेली झाडे पडलेली दृष्टीस पडत असून हे चित्र संताप आणणारे ठरत आहे.
मानवाला शुद्ध ऑक्सिजन पुरविण्यासोबतच वृक्ष पर्यावरणात मोलाची भूमिका बजावतात. जिल्ह्याच्या चहूबाजूने मोठी वनसंपदा आहे. मात्र, मागील पाच वर्षांपासून सुरू असलेल्या जीवघेण्या विकासकामांमुळे वनसंपदेवरच घाला घातला जात आहे.
बुटीबोरी-तुळजापूर मार्गाचे सिमेंटीकरण आणि रुंदीकरण पूर्णत्वास गेले. या मार्गाच्या बांधकामावेळीही हजारांवर वृक्षांची कत्तल करण्यात आली. तसेच शहरातील दादाजी धुनिवाले चौक ते आर्वी नाकापर्यंत रस्त्याचे सिमेंटीकरण आणि रुंदीकरण करण्यात आले. आर्वी नाका ते जुनापाणी चौकापर्यंतही रस्त्याचे रुंदीकरण आणि सिमेंटीकरण झाले. या सर्वच कामात आड येणाºया डेरेदार वृक्षांची बेसुमार तोड करण्यात आली. त्यामुळे एकेकाळी हिरवेपण असलेले हे मार्ग आज ओसाड झाले आहेत.
प्रशासनाकडून संबंधित मार्गांलगत वृक्षलागवड करण्यात येईल, असे प्रारंभी सांगण्यात आले होते. मात्र, चार वर्षांचा काळ लोटूनही वृक्षलागवड करण्यात आलेली नाही. याकडे शासन आणि प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे. वृक्षतोड थांबवावी अथवा विकासकामांना स्थगिती देण्यात यावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.

विकासकामे थांबवा
सेवाग्राम ते आष्टा फाट्यापर्यंत रस्त्याचे बांधकाम सुरू आहे. याकरिता मोठ्या प्रमाणावर वृक्षांचा बळी घेण्यात आला आहे. त्यामुळे भविष्यात हा मार्गही ओसाड होण्याच्या मार्गावर आहे. शासन वृक्षलागवडीकरिता विविध योजना राबवित असले तरी वृक्षतोडीच्या प्रमाणात लागवड नाही, ही वस्तुस्थिती आहे. यामुळे जिल्ह्यातील पर्यावरणप्रेमींमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. असा जीवघेणा विकास नको, असा संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. पर्यावरणाचा ऱ्हास करणारी विकासकामे थांबवावी, अशी मागणी वर्धेकर नागरिकांतून होत आहे.

Web Title: Transmitted to trees that have been impeded by development

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.