जिल्ह्यात कोरोनाचा एकही पॉझिटिव्ह रुग्ण नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2020 06:00 AM2020-03-16T06:00:00+5:302020-03-16T06:00:06+5:30

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर चीन (बिजिंग) येथून १३ विद्यार्थी येथील महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठात आल्याची माहिती मिळताच त्यांना आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आले होते. तब्बल १४ दिवस वैद्यकीय तज्ज्ञांच्या निघरानी त्यांना ठेवल्यानंतर कोरोनाची कुठलेही लक्षण नसल्याची क्लिनचिट देण्यात आली आहे.

There is no single positive patient for Corona in the district | जिल्ह्यात कोरोनाचा एकही पॉझिटिव्ह रुग्ण नाही

जिल्ह्यात कोरोनाचा एकही पॉझिटिव्ह रुग्ण नाही

Next
ठळक मुद्दे१४ व्यक्तींना क्लिनचिट : इंडोनेशियातून आलेल्या दोघांचे नमुने निगेटिव्ह

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : सध्या जगभरात कोरोना या व्हायरसने थैमान घातले आहे. याच व्हायरसचा प्रसार कुठल्याही परिस्थितीत वर्धा जिल्ह्यात होऊ नये म्हणून वर्धा जिल्हा प्रशासनासह आरोग्य विभागाने कंबर कसली आहे. विदेशवारी करून आतापर्यंत वर्धा जिल्ह्यात परतलेल्या २६ व्यक्तींना आरोग्य विभागाच्या तज्ज्ञांच्या निघरानीत १४ दिवस ठेऊन तब्बल १४ व्यक्तींना कोरोनाचे कुठलेही लक्षण नसल्याची क्लिनचिट देण्यात आली आहे.
विशेष म्हणजे, इंडोनेशिया येथून आलेल्या दोन व्यक्तींचे रक्तासह घशातील द्रवाचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले; पण त्यांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर चीन (बिजिंग) येथून १३ विद्यार्थी येथील महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठात आल्याची माहिती मिळताच त्यांना आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आले होते. तब्बल १४ दिवस वैद्यकीय तज्ज्ञांच्या निघरानी त्यांना ठेवल्यानंतर कोरोनाची कुठलेही लक्षण नसल्याची क्लिनचिट देण्यात आली आहे. तर साऊथ कोरिया येथून आलेल्या एका व्यक्तीलाही १४ दिवस तज्ज्ञांच्या निगरानीत ठेवून क्लिनचिट देण्यात आली आहे. इंडोनेशिया येथून वर्ध्यात परतलेल्या दोन व्यक्तींची प्रकृती अस्थिर असल्याचे लक्षात येताच त्यांचे रक्तासह घशातील द्रवाचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते. त्याचा अहवालही आरोग्य विभागाला प्राप्त झाला असून तो निगेटिव्ह असल्याचे सांगण्यात आले. वर्ध्या जिल्ह्यात कोरोनाचा एकही प्रॉझिटिव्ह रुग्ण आढळलेला नाही. मात्र, विदेशातून वर्ध्यात परतणाऱ्या प्रत्येक व्यक्तीवर करडी नजर ठेवली जात आहे. त्यामुळे वर्र्धेकरांनी कोरानाबाबतच्या कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. शिवाय दक्ष म्हणून प्राथमिक उपाययोजना कराव्या असे आवाहन जिल्हा प्रशासनासह आरोग्य विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.

विदेशवारी करून वर्ध्यात परतले २६ व्यक्ती
विदेशवारी करून वर्धा जिल्ह्यात आतापर्यंत २६ व्यक्ती परतल्याची नोंद जिल्हा प्रशासनाने घेतली आहे. यात चीन (बिजिंग) १३ विद्यार्थी, साऊस कोरीया येथील एक व्यक्ती, दुबई येथून आलेले सात व्यक्ती, इंडोनेशियातून आलेले दोन व्यक्ती तर अ‍ैझान, इटली आणि इराण येथून आलेल्या प्रत्येकी एका व्यक्तीचा समावेश आहे.

सहा व्यक्तींची झाली रविवारी तपासणी
दुबई येथून परतलेल्या सात व्यक्तींमध्ये कोरोनाची लक्षणे आढळलेली नाही. पण, दक्षता म्हणून सुरुवातीला त्यांना होम आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आले होते. मात्र, त्यापैकी सहा व्यक्ती जिल्हा प्रशासन आणि आरोग्य विभागाकडून देण्यात आलेल्या सूचनांकडे पाठ दाखवित असल्याचे लक्षात येताच या सहा व्यक्तींची आज पुन्हा आरोग्य तपासणी करण्यात आली. शिवाय त्यांना समोपदेशन करून होम आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आले आहे. या व्यक्तींवर मागील १२ दिवसांपासून तज्ज्ञ वैद्यकीय अधिकारी लक्ष ठेवून आहेत. त्यांच्यात कोरोनाची कुठलीही लक्षणे आतापर्यंत आढळून आलेली नाही.

पाच रुग्णालयांत आयसोलेशन कक्ष
जिल्ह्यातील पाच विविध रुग्णालयात आयसोलेशन कक्ष तयार करण्यात आले आहे. शिवाय सावंगी (मेघे) येथील रुग्णालयात १०० खाटांचा क्वॉरंटाईन कक्ष तयार करण्यात आला आहे.

होम आयसोलेशनमध्ये चार व्यक्ती
दुबई येथून आलेला एक व्यक्ती तर इटली, इराण व अ‍ैझान येथून आलेले प्रत्येकी एक असे एकूण चार व्यक्तींमध्ये कोरोनाची कुठलीही लक्षणे आतापर्यंत आढळून आलेली नाही; पण दक्षता म्हणून त्यांना त्यांच्या घरातच म्हणजे होम आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आले आहे. शिवाय तज्ज्ञ वैद्यकीय अधिकारी त्यांच्या हालचालींवर करडी नजर ठेऊन आहेत.

दक्षता म्हणून युद्धपातळीवर उपाययोजना केल्या जात आहेत. शिवाय विदेशवारी करून आलेल्या व्यक्तींना तज्ज्ञ वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या निघरानीत ठेवले जात आहे. आतापर्यंत जिल्ह्यात कोरोनाची लागण झालेला एकही रुग्ण आढळलेला नाही. त्यामुळे नागरिकांनी घाबरण्याचे कारण नाही. मात्र, दक्षता म्हणून नागरिकांनी वेळोवेळी हात स्वच्छ धुवावे. गर्दीच्या ठिकाणी जाण्याचे टाळावे. तसेच खोकलताना आणि शिंकताना तोंडासमोर रुमाल धरावा.
- डॉ. अजय डवले, जिल्हा आरोग्य अधिकारी, वर्धा.

Web Title: There is no single positive patient for Corona in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.