शासकीय खरेदीला मुहूर्तच साधेना

By Admin | Updated: October 18, 2015 02:22 IST2015-10-18T02:22:10+5:302015-10-18T02:22:10+5:30

साधारणत: कापूस खरेदीकरिता दसऱ्याचा मुहूर्त साधण्यात येतो. कापूस उत्पादकांचा कापूस निघणे सुरू झाले आहे.

The purchase of government is simple | शासकीय खरेदीला मुहूर्तच साधेना

शासकीय खरेदीला मुहूर्तच साधेना

पणन महासंघाला आदेशाची प्रतीक्षा : खासगीत ४,२०० रुपयांचा दर
रूपेश खैरी वर्धा
साधारणत: कापूस खरेदीकरिता दसऱ्याचा मुहूर्त साधण्यात येतो. कापूस उत्पादकांचा कापूस निघणे सुरू झाले आहे. याची माहिती मिळताच खासगी व्यापाऱ्यांनी खरेदी सुरू केली. शासकीय खरेदीसंदर्भात मात्र अद्याप कुठल्याही सूचना पणन महासंघाकडून येथील शाखेत आल्या नाहीत. खरेदीसंदर्भात निर्णय घेणारे अध्यक्ष व संचालक विदेश वारीवर असल्याने यंदा दसऱ्याचा मुहूर्त टळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
खरेदीसंदर्भात उदासिनता व दरासंदर्भातील राजकारण कायम असल्याने कापूस उत्पादकांची कोंडी यंदाही होणार असल्याचे दिसते. कृषी मूल्य आयोगाची ६ हजार ५०० रुपयांची शिफारस झुगारत राज्य शासनाकडून ४ हजार १०० रुपये हमीभाव जाहीर झाला आहे. गत वर्षीच्या तुलनेत झालेली ही वाढ केवळ ५० रुपयांची ठरली. २०१४ च्या हंगामात कापसाला ४ हजार ५० रुपये हमीभाव जाहीर झाला होता. यामुळे दरवाढीसंदर्भातील मुस्कटदाबी सत्ताधारी बदलले तरी तशीच आहे. सोयाबीन हातचे गेल्यानंतर शेतकऱ्यांना कपाशीकडून अपेक्षा होती. मात्र नेहमीप्रमाणे तीही धुळीस मिळणार असल्याचे दिसत आहे.
सत्ताधारी विरोधात असताना कापसाला ७ हजार रुपये दर देण्याची मागणी करीत होते. त्यांच्याकडून कृषी मूल्य आयोगाची शिफारस योग्य होती. आता त्यांच्याकडूनही कृषीमूल्य आयोगाची ६ हजार ५०० रुपयांची शिफारस फेटाळत ४ हजार १०० रुपये दर जाहीर करण्यात आला आहे.
संचालक व अध्यक्ष विदेशवारीवर
शेतकऱ्यांचा कापूस शेतातून निघण्याची वेळ आली आहे. यामुळे शेतकऱ्यांना निदान हमीभाव मिळावा अशी अपेक्षा आहे. त्यांची ही अपेक्षा पूर्ण होण्याकरिता पणन महासंघाची किंवा सीसीआयची खरेदी सुरू होणे अपेक्षित आहे. या खरेदीचा निर्णय घेणारे पणन महासंघाचे अध्यक्ष तथा संचालक विदेश वारीवर गेल्यास सूत्रांनी सांगितले. यामुळे कापूस खरेदी संदर्भात अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आला नाही. यामुळे ती केव्हा सुरू होईल या बाबत संभ्रम निर्माण झाला आहे. शासकीय खरेदी नसल्याने शेतकऱ्यांना त्यांचा कापूस खासगी व्यापाऱ्यांना विकण्याची वेळ आली आहे.
एकरी २० हजारांचा होतो खर्च
कापूस केवळ खरीपच नाही तर रबी हंगामाचे पीक म्हणूनही ओळखले जाते. पेरणीपूर्व मशागत, बियाणे व खते, पेरणीचा खर्च, निंदन, डवरणी, फवारणी व वेचाई करून कापूस शेतकऱ्यांच्या घरापर्यंत येतो. येथून नंतर बाजारपेठेचा प्रवास. याचा एकंदर उत्पादन खर्च हा ओलिताच्या क्षेत्रात एकरी २० हजारांवर जात आहे.
कापूस खरेदी केंद्र केव्हा उघडणार
कापसाची वेचाई सुरू झालेली आहे. पणन महासंघाचे व सीसीआयचे कापूस खरेदी केंद्र सुरू झालेले नाही. येत्या महिन्यात ही केंद्र सुरू होणार किंवा नाही या बाबतही साशंकता आहे. सण, उत्सव व दिवाळीच्या पार्श्वभूमीवर शेतकरी आर्थिक अडचणीत खासगी व्यापाऱ्यांना कापूस विकत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

Web Title: The purchase of government is simple