Name of the facility for customers at State Bank | स्टेट बँकेत ग्राहकांसाठी सुविधा नावालाच
स्टेट बँकेत ग्राहकांसाठी सुविधा नावालाच

ठळक मुद्देव्यवस्थापकांचे दुर्लक्ष। एटीएमही बंद

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : येथील मगनवाडी भागातील स्टेट बँकेच्या मुख्य शाखेत सध्या ग्राहकांसाठी असलेल्या सुविधा केवळ नावालाच असल्याचा प्रत्यय बँकेचा फरफटका मारल्यावर येतो. शिवाय तशी ओरडही सध्या तेथे बँक खाते असलेल्या नागरिकांकडून होत आहे. ऐन दिवाळीच्या दिवसात याच बँकेच्या आवारात असलेले दोन्ही एटीएम गत दहा दिवसांपासून बंद आहेत. तसेच बँकेत काऊंटरवर पाच हजार रुपयांसाठीही नागरिकांना एक ते दोन तास ताटकळत रहावे लागल आहे. विशेष म्हणजे याकडे बँकेच्या व्यवस्थापकांचे दुर्लक्ष होत असून एकूणच सदर प्रकाराचा सर्वाधिक त्रास या बँकेत खाते असलेल्या नागरिकांना सहन करावा लागत आहे.
सर्वात जुनी आणि विश्वास पात्र असलेली बँक म्हणून भारतीय स्टेट बँकेची ओळख. इतकेच नव्हे तर या बँकेत वर्धा जिल्ह्यातील अनेक नागरिकांचे बचत खाते आहेत. तर अनेकांचे वेतन खातेही आहेत. शिवाय अनेक जेष्ठ नागरिकांची पेंशन याच बँकेत असलेल्या बँक खात्यात जमा होतात. त्यामुळे वर्धा शहरातील मगनवाडी भागातील भारतीय स्टेट बँकेच्या शाखेत नेहमीच गर्दी राहते. येथे असलेल्या कामाचा व्याप लक्षात घेता बँकेच्या आवारातच एटीएम कक्षाची निर्मिती करण्यात आली आहे. सुरूवातीला तेथे एकच एटीएम मशीन होती. परंतु, वाढता व्याप लक्षात घेता तेथील एटीएम मशीनच्या संख्येत वाढ करण्यात आली आहे. शहराच्या मध्यभागी ही एटीएम कक्ष असल्याने येथे नेहमीच नागरिकांची गर्दी असते. परंतु, मागील दहा दिवसांपासून या एटीएम केंद्रावरील दोन मशीन बंद आहेत. एटीएम बंद असल्याने नागरिकांना बँकेत जाऊन एक ते दोन तास रांगेत उभे राहून रोकड मिळवावी लागत आहे. बँक अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षीत धोरणांचा सर्वाधिक त्रास जेष्ठ नागरिकांना सहन करावा लागत आहे. या प्रकरणी तातडीने योग्य कार्यवाही करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांची आहे. सदर प्रकरणी बँके प्रशासनाची बाजू जाणून घेतली असता बँकेच्या व्यवस्थापकांकडून प्रतिसाद मिळाला नाही.

Web Title: Name of the facility for customers at State Bank

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.