विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधणारी आदर्श शाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2019 06:00 AM2019-12-30T06:00:00+5:302019-12-30T06:00:11+5:30

या शाळेमध्ये वर्गखोलीसोबतच परिसर सजावटीवर भर देण्यात आला. भित्तीपत्रकावर घोषवाक्ये, अभ्यासक्रमातील महत्त्वाचे मुद्दे, सण-उत्सव, दिनविशेष यापासून तर भाषा व गणिताचाही समावेश करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांना खेळता-खेळता शिकता यावे हाच या मागचा उद्देश असून यात भर घातली ती परसबागेने. शाळेच्या सुशोभिकरणासह विद्यार्थ्यांना आधुनिकतेची जाण करुन देण्यासाठी ई-लर्निंग सुरु केले.

An ideal school for the overall development of students | विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधणारी आदर्श शाळा

विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधणारी आदर्श शाळा

Next
ठळक मुद्देनावीन्यपूर्ण उपक्रमांवर भर : खासगी शाळांनाही लाजवेल असा परिसर व दर्जेदार शैक्षणिक वातावरण

लोकमत न्यूज नेटवर्क
सेवाग्राम : शाळा संस्काराचे केंद्र आहे. विद्यार्थ्यांची जडणघडण होते, ती शाळेतच; पण कालौघात शिक्षण प्रक्रिया बदलली. गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि कृतिशील शिक्षणावर भर देण्याकडे कल वाढला. यातही काही शाळांकडून शैक्षणिकदृष्ट्या विशेष कार्य केले जात आहे. यात सेवाग्राम येथील हावरे ले-आऊटमधील शाळा विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाचा उद्देश ठेवून कार्य करणारी एक आदर्श शाळा ठरली आहे.
या शाळेमध्ये वर्गखोलीसोबतच परिसर सजावटीवर भर देण्यात आला. भित्तीपत्रकावर घोषवाक्ये, अभ्यासक्रमातील महत्त्वाचे मुद्दे, सण-उत्सव, दिनविशेष यापासून तर भाषा व गणिताचाही समावेश करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांना खेळता-खेळता शिकता यावे हाच या मागचा उद्देश असून यात भर घातली ती परसबागेने. शाळेच्या सुशोभिकरणासह विद्यार्थ्यांना आधुनिकतेची जाण करुन देण्यासाठी ई-लर्निंग सुरु केले. संगणक व लॅपटॉपच्या सहाय्याने विद्यार्थ्यांना शिक्षणाची गोडी लावली. येथील विद्यार्थी शिक्षणासह भाषण, गीत,आणि नृत्यामध्येही कुठे कमी नाही. या शाळेत हिंदी भाषिक विद्यार्थ्यांची संख्या अधिक आहे. या शाळेत येणाऱ्या प्रत्येकाचे विद्यार्थी प्रवेशद्वारावर हसून स्वागत करतात. आदर्श शाळेतील हे परिवर्तन पाहण्यासाठी आतापर्यंत शासकीय अधिकारी, शिक्षण संस्थांचे संचालक तसेच महाराष्ट्रातील विविध शाळांतील शिक्षक अशा जवळपास पाच हजार व्यक्तींनी या शाळेला भेट देऊन गौरव केला आहे.

‘प्रकाश’मय झाले जीवन
हावरे ले-आऊटमधील जिल्हा परिषदेच्या शाळेत २०१० मध्ये बालवाडी सुरु करण्यात आली. त्यानंतर पहिली ते चौथीपर्यंत शाळा सुरू झाल्यावर २०११ पासून या शाळेत प्रकाश कांबळे नामक शिक्षक रुजू झाले. त्यांनी या शाळेतील चेहरामोहरा बदविण्यासाठी पदरमोड केली. परिणामी, शाळेतील विद्यार्थ्यांच्या जीवनासह परिसरातील वातावरणही ‘प्रकाश’मय झाले आहे. आज ही शाळा जिल्ह्यात एक आदर्श शाळा म्हणून ओळखली जात आहे.

विद्यार्थ्यांच्या विकासाकरिता घर व शाळेतील वातावरण महत्त्वाचे आहे. ते या ठिकाणी निर्माण करण्यात आले आहे. सहकार्य व विश्वास महत्त्वाचा असून तो शाळेत देत आहे.
-प्रयोग तेलंग, मुख्याध्यापक
शाळा खूप चांगली असून शिक्षकांकडून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर भर दिला जात आहे. विद्यार्थ्यांची गुणवत्ताही सुधारत असल्याने मी माझ्या मुलाला याच शाळेत प्रवेश दिला.
-प्रा.महादेव चुुंचे, पालक

पालक, नागरिकांकडून शाळेला मदतीचा हात
विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास घडविणाऱ्या या शाळेच्या विविध उपक्रमांमध्ये तसेच भौतिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी पालक, नागरिक मदतीचा हात देतात.

Web Title: An ideal school for the overall development of students

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Schoolशाळा