नदी काठावरील ८८ गावांना पुराचा धोका

By Admin | Updated: May 1, 2016 02:08 IST2016-05-01T02:08:54+5:302016-05-01T02:08:54+5:30

जिल्ह्यात नदी काठावरील ८८ गावांना पावसाळ्यात पुराचा धोका असतो. शिवाय अन्य उपाययोजनाही कराव्या लागतात.

The danger of flooding of 88 villages on river banks | नदी काठावरील ८८ गावांना पुराचा धोका

नदी काठावरील ८८ गावांना पुराचा धोका

वर्धा : जिल्ह्यात नदी काठावरील ८८ गावांना पावसाळ्यात पुराचा धोका असतो. शिवाय अन्य उपाययोजनाही कराव्या लागतात. नैसर्गिक आपत्ती, अतिवृष्टी आणि पुरामुळे उद्भवणाऱ्या परिस्थितीवर मात करण्यासाठी करायच्या उपाययोजनांबाबत जिल्हा व्यवस्थापन आराखडा तयार करण्यात आला आहे. कोणतीही आपत्ती उद्भवल्यास जिल्हास्तरीय यंत्रणा सज्ज ठेवावी, अशी सूचना जिल्हाधिकारी दीपक नलावडे यांनी दिल्यात.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात नैसर्गिक आपत्ती तसेच मॉन्सून पूर्व तयारीचा आढावा जिल्हाधिकारी नलावडे यांच्या अध्यक्षतेत घेण्यात आली. यावेळी जिल्ह्यातील सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते. नैसर्गिक आपत्ती, अतिवृष्टी व पूर परिस्थितीमध्ये करावयाच्या उपाययोजनांबाबत विभागनिहाय जिल्हा व्यवस्थापन आराखडा तयार करण्यात आला आहे. जिल्ह्याच्या संकेत स्थळावरही तो उपलब्ध आहे. यात नैसर्गिक आपत्ती निवारणासाठी विभागनिहाय अधिकाऱ्यांचे दूरध्वनी क्रमांक तसेच विभागांच्या कार्यप्रणालीबाबत माहिती देण्यात आलेली आहे.
तालुकास्तरावर मान्सून पूर्व आढावा बैठकीतून नदी आणि नाल्यांमुळे बाधित होणाऱ्या गावांची माहिती घेऊन पूर परिस्थिती उद्भवल्यास करावयाच्या उपाययोजनांबाबत आराखडा तयार करावा, अशा सूचना करतानाच जिल्हाधिकाऱ्यांनी या आराखड्यात ग्रामपंचायत स्तरावरील ग्रामसेवक व प्रमुख व्यक्तींची नावे असलेली दूरध्वनीसह यादी तयार करावी, नगर परिषदा व ग्रामपंचायत क्षेत्रातील गावांमधून धोकादायक इमारतींच्या मालकांना सूचना देण्यात यावी, नदी व नाल्यातील कचरा व गाळ काढण्याची मोहीम राबवावी, असेही सांगितले.
जिल्ह्यात असलेल्या आरोग्य सुविधा आणि त्या अंतर्गत असणाऱ्या गावांची माहिती, मोठे व मध्यम प्रकल्पांमध्ये असलेल्या पाणीसाठा याबाबत तसेच पूर नियंत्रणाबाबत आपतकालीन कृती आराखडा तयार करून जलाशयाची पातळी दररोज जिल्हा नियंत्रण कक्षाकडे उपलब्ध करून देण्यात यावी, अशा सूचनाही करण्यात आली.
पोलीस विभाग, जिल्हा दूरसंचार यंत्रणा, सार्वजनिक बांधकाम विभाग, प्रादेशिक परिवहन विभाग, होमगार्ड, जिल्हा परिषद, गटशिक्षणाधिकारी, महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी, महामंडळ यांच्यातर्फे मान्सूनपूर्व तयारी संदर्भात केलेल्या कार्यवाहीचा आढावा यावेळी घेण्यात आला. निवासी उपजिल्हाधिकारी वैभव नावडकर यांनी नैसर्गिक आपत्ती निवारणार्थ उपाययोजनांबाबत सादरीकरण केले.(कार्यालय प्रतिनिधी)

Web Title: The danger of flooding of 88 villages on river banks