व्हीआयपी मार्गाची दुर्दशा कायमच

By Admin | Updated: June 9, 2014 23:48 IST2014-06-09T23:48:32+5:302014-06-09T23:48:32+5:30

सिव्हिल लाइन परिसरातील व्हीआयपी मार्गाच्या डांबरीकरणाचा प्रश्न प्रलंबित आहे. त्यामुळे या मार्गाची डागडुजी कधी होणार असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

Always the plight of the VIP route | व्हीआयपी मार्गाची दुर्दशा कायमच

व्हीआयपी मार्गाची दुर्दशा कायमच

वर्धा :  सिव्हिल लाइन परिसरातील व्हीआयपी मार्गाच्या डांबरीकरणाचा प्रश्न प्रलंबित आहे. त्यामुळे या मार्गाची डागडुजी कधी होणार असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
इंदिरा गांधी पुतळ्याशेजारी कोपर्‍यात अर्धवट डांबरीकरण करण्यात आले. मात्र उर्वरित मार्ग जैसे थे ठेवण्यात आला आहे. सिव्हिल लाइन भागात अनेक अधिकार्‍यांची निवासस्थाने आहे. शिवाय शासकीय कार्यालये, शाळा महाविद्यालये आहेत. दररोज शेकडो वाहनांचे या मार्गाने आवागमन सुरु असते. अनेक दिवसांपासून या मार्गाची वाताहत झालेली आहे. रस्त्यावर जागोजागी खड्डे पडले आहे. त्यामुळे रस्त्याची पुरती चाळणी झालेली आहे. वाहनचालकांना या मार्गाने जाताना तारेवरची कसरत करावी लागते.
रस्त्यावरील खड्डे चुकविण्याच्या नादात अनेकदा येथे अपघात झाले आहेत. कित्येक दिवसांपासून रस्त्याची अशी अवस्था झालेली असताना याकडे कुणीही लक्ष देण्यास तयार नसल्याचे दिसते.
सकाळपासूनच या रस्त्याने मोठी वर्दळ असते. शासकीय विश्रामगृह, जिल्हाधिकारी कार्यालय, पोलिस अधीक्षक कार्यालयाकडे याच मार्गाने जावे लागते. विश्रामगृहात शासनाचे वरिष्ठ अधिकारी, लोकप्रतिनिधी आदींचे नित्याचे येणे असते. सेवाग्राम येथील महात्मा गांधींच्या आश्रमाला याच मार्गाने जोडण्यात आले आहे.
विशेष म्हणजे सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यालयही याच मार्गावर असताना या कार्यालयातील अधिकार्‍यांचे रस्त्याच्या दुरवस्थेकडे लक्ष कसे जात नाही, असा प्रश्न येथून मार्गक्रमण करणार्‍यांकडून उपस्थित कोल जात आहे.
इंदिरा गांधी यांच्या पुतळ्याशेजारी केवळ डांबरीकरणाचा पॅच मारण्यात आला. मात्र उर्वरित रस्त्याचे बांधकाम करण्याचा संबंधित विभागाला विसर पडला. या रस्त्याच्या दुरुस्तीविषयी जिल्हा प्रशासनाची कायम उदासिनता असल्याचे स्पष्ट होत आहे. पावसाळ्यात या रस्त्याची पुन्हा वाताहत होणार असल्याचे चित्र आहे.(शहर प्रतिनिधी)

Web Title: Always the plight of the VIP route