वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2025 21:28 IST2025-08-28T21:28:17+5:302025-08-28T21:28:46+5:30
वीज पडल्याने २९ शेळ्यांचा मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेत शेळी पालकांचे मोठे नुकसान झाले. सुदैवाने रखवालदार थोडक्यात बचावले.

वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
वर्धा तालुक्यातील जैतापूर शिवारात गुरुवार, २८ रोजी दुपारी ३:०० वाजताच्या सुमारास मुसळधार पाऊस झाला. दरम्यान, वीज पडल्याने २९ शेळ्यांचा मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेत शेळी पालकांचे मोठे नुकसान झाले. सुदैवाने रखवालदार थोडक्यात बचावले.
शेळ्या दगावल्याची माहिती मिळताच सरपंच छाया विलास उईके यांनी तहसीलदार, बीट अंमलदार आणि तालुका पशुधन विकास अधिकाऱ्यांना माहिती दिली. गावात माहिती होताच ग्रामस्थांनी परिसरात धाव घेतली. विजांचा आवाज होत असताना डोंगरगाव शिवारात चरण्यास गेलेल्या शेळ्यांच्या कळपावर वीज कोसळली. सर्व २९ शेळ्या जागीच दगावल्या. यामधे जैतापूर येथील देविदास उईके यांच्या मालकीच्या १६ शेळ्या, सुरेश चौधरी यांच्या मालकीच्या ४, पंकज सोनोने यांच्या मालकीच्या ३, वसंत कुसराम यांच्या मालकीच्या ३, भगवान जिवतूजी मडावी यांच्या २, किसन भुताजी उईके यांची १ शेळी होती. यासोबत दोन पाळीव श्वानदेखील दगावले. देखभाल करणारे रखवालदार देविदास माधव उईके आणि विश्राम किसना बोटरे हे थोडक्यात बचावले.
घटनास्थळ आहे जंगलात
वीज कोसळली ते स्थळ जंगलात आहे. त्यामुळे सायंकाळी ही घटना माहिती पडली. पशुधन विकास अधिकारी डॉ. राहुल नानोटकर आणि पशुधन पर्यवेक्षक डॉ. भालचंद्र जाणे यांनी शवविच्छेदन केले. तलाठी सविता भगत तसेच ग्रामसेवक कृष्णा कुरवाडे यांनी सरपंच छाया उईके, पोलिसपाटील सुनीता तंतरपाळे, माजी सरपंच गंगाधर मडावी यांच्या उपस्थितीत पंचनामा करून तहसील कार्यालयात अहवाल सादर केला.
५.८० लाखांचे नुकसान
पंचनामा करून तहसील कार्यालयात अहवाल सादर केला असता यात शेळी मालकांचे जवळपास ५ लाख ८० हजार रुपयांचे नुकसान झाल्याचे नमूद आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीमुळे नुकसानग्रस्त आर्थिक संकटात सापडले आहेत. प्रशासनाने तातडीने नुकसान भरपाई मंजूर करावी, अशी मागणी सरपंच छाया उईके यांच्यासह ग्रामस्थांकडून केली जात आहे.