चारित्र्याच्या संशयावरून सतत भांडण, पत्नीला संपवून पतीची आत्महत्या, प्रेमाचा भयंकर शेवट!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2026 13:52 IST2026-01-19T13:45:16+5:302026-01-19T13:52:04+5:30
Uttar Pradesh Kushinagar Crime: रागाच्या भरात पतीने पत्नीची हत्या करून स्वतःचं आयुष्य संपवलं. अवघ्या काही महिन्यांपूर्वी झालेल्या लव्ह मॅरेजचा अंत झाल्याने परिसरात खळबळ माजली आहे.

चारित्र्याच्या संशयावरून सतत भांडण, पत्नीला संपवून पतीची आत्महत्या, प्रेमाचा भयंकर शेवट!
उत्तर प्रदेशातील कुशीनगर जिल्ह्यातील तरयासुजन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बधाई टोला येथे एका पतीने पत्नीची निर्घृण हत्या करून स्वतःचे जीवन संपवल्याची धक्कादायक घटना घडली आहे. संशय आणि रागाच्या भरात घडलेल्या या कृत्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री अरुण शर्मा आणि त्याची पत्नी नेहा भारती यांच्यात जोरदार भांडण झाले. वादाचे रूपांतर हाणामारीत झाले आणि रागाच्या भरात अरुणने भाजी कापण्याच्या धारदार विळ्याने नेहाचा गळा चिरला. नेहा रक्ताच्या थारोळ्यात जमिनीवर कोसळली आणि तिचा जागीच मृत्यू झाला. पत्नीची हत्या केल्यानंतर, अपराधीपणाच्या भावनेतून किंवा भीतीने अरुणने त्याच खोलीत गळफास लावून आपली जीवनयात्रा संपवली.
अरुण आणि नेहा यांनी गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये कुटुंबीयांच्या इच्छेविरुद्ध जाऊन प्रेमविवाह केला होता. सुरुवातीला सर्व काही सुरळीत वाटत असतानाच, गेल्या काही काळापासून त्यांच्यात वारंवार खटके उडू लागले होते. संशय आणि सततच्या वादांमुळे त्यांच्या नात्यात दुरावा निर्माण झाला होता. अखेर याच रागाने दोन तरुण जीवांचा बळी घेतला.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. फॉरेन्सिक टीमने घटनास्थळावरून रक्ताने माखलेले शस्त्र आणि इतर पुरावे गोळा केले. दोन्ही मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवण्यात आले असून, पोलीस या प्रकरणाचा सर्व बाजूंनी तपास करत आहेत.