मीरा भाईंदर महापालिका कचरा ठेकेदाराच्या कचरा गाड्या बंद करून कारवाईची ग्रामस्थांची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2025 14:01 IST2025-09-28T14:00:37+5:302025-09-28T14:01:14+5:30
मीरा भाईंदर महापालिकेच्या ठेकेदाराकडील कचरा वाहून नेणाऱ्या गाड्यांचा बेफामपणा कायम असून पुन्हा एका कचरा गाडीने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार वृद्धाचा मृत्यू झाल्याच्या घटनेनंतर ग्रामस्थ संतप्त झाले आहेत.

मीरा भाईंदर महापालिका कचरा ठेकेदाराच्या कचरा गाड्या बंद करून कारवाईची ग्रामस्थांची मागणी
मीरारोड- मीरा भाईंदर महापालिकेच्या ठेकेदाराकडील कचरा वाहून नेणाऱ्या गाड्यांचा बेफामपणा कायम असून पुन्हा एका कचरा गाडीने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार वृद्धाचा मृत्यू झाल्याच्या घटनेनंतर ग्रामस्थ संतप्त झाले आहेत. त्यांनी ठेकेदारासह पालिका अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची आणि कचरा गाड्या बंद करण्याची मागणी केली आहे. वाहतूक पोलीस, आरटीओ ने अशा वाहनांवर कारवाईस चालवलेली टाळाटाळबद्दल नाराजी व्यक्त केली जात आहे.
मीरा भाईंदर शहराचा सर्व कचरा हा भाईंदरच्या उत्तन धावगी डोंगरावर मोठया प्रमाणात बेकायदा डम्पिंग केला जातो. वास्तविक शासनाने कचरा प्रकल्पसाठी जागा दिली असताना प्रक्रिया नाममात्र केली जातेच शिवाय मोठ्या प्रमाणात अतिक्रमणकडे पालिकेने दुर्लक्ष चालवले आहे. त्यामुळे येथे कचऱ्याचे डोंगर उभे राहून लिचेटमुळे शेतजमीन नष्ट झाली, पाणीसाठा, नवीखाडी प्रदूषित झाली. रोगराई - दुर्गंधी आणि आगी लागून पसरणाऱ्या घातक धुरामुळे प्रदूषण प्रचंड वाढून लोकांना जगणे नकोसे झाले आहे असा आक्रोश येथील नागरिकांचा आहे.
सातत्याने तक्रारी होऊन देखील महापालिका ठोस कार्यवाही करत नाही. तर प्रदूषण नियंत्रण मंडळ, पर्यावरण व नगरविकास विभाग आणि शासन देखील डोळेझाक करत आले आहे. हा सर्व त्रास कमी म्हणून कचरा वाहून नेणाऱ्या गाड्यांचा हैदोस तर जीवघेणा ठरत आहे. कचरा वाहून नेणाऱ्या गाड्यां ये - जा करताना मार्गावर दुर्गंधी पसरवत जातात शिवाय त्यातून पडणाऱ्या लिचेटमुळे रस्ते बुळबुळीत होऊन दुचाकी वाहने घसरणे आदी प्रकार नेहमीच होत असतो.
कचरा गाड्या बेफाम आणि बेधुंद पळवल्या जातात. वाट्टेल तसे ओव्हरटेक करतात. जेणेकरून जीवघेणे अनेक अपघात घडले आहेत. कचरा गाड्या वाहनांना धडक देणे, झाडांना वा रस्त्याच्या कडेला आदळणे असे प्रकार सर्रास होत असतात. अनेकदा चालक मद्यधुंद अवस्थेत असतात असा आरोप स्थानिकांनी सातत्याने चालवला आहे. शिवाय भरणीचे डम्पर, पाण्याचे टँकर देखील भरधाव असतात. अनेकांचे बळी जाऊन देखील वाहतूक पोलीस, आरटीओ कडून ठोस कारवाई होत नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
शुक्रवारी उत्तन डम्पिंगकडे भरधाव जाणाऱ्या कचरा गाडीने दुचाकीला धडक दिली असता ६२ वर्षीय गेहरीलाल लालचंद जैन (छाजेड) यांचा मृत्यू झाला. अपघात करून रक्तबंबाळ अवस्थेत पडलेल्या जैन यांना मदत न करताच कचरा गाडी चालक प्रदीप आत्माराम पाटील रा. सफाळे हा पळून गेला. पोलिसांनी नंतर त्याचा शोध घेऊन त्याला अटक केली. मात्र घटनेने स्थानिक नागरिकांचा संताप पुन्हा व्यक्त होऊ लागला आहे.
बर्नड डिमेलो ( मच्छीमार नेते) - बेकायदा कचरा डम्पिंगने स्थानिकांचे जीवन आधीच असह्य झाले आहे. त्यात पालिका कचरा गाडयांना लाईट, क्रमांक, चालक सहकारी नसतो. चालक मद्यपान करून गाड्या दामटवतात. कचरा गाड्यांचे फिटनेस प्रमाणपत्र, योग्य कागदपत्रे, चालकांची तपासणी आरटीओ, वाहतूक पोलिसांनी काटेकोर व नियमित करून कारवाई केली पाहिजे.
जेम्स बोर्जिस ( डोंगरी - पालखाडी ग्रामस्थ ) - कचरा ठेकेदार, गाडी चालक - मालक यांच्यावर गुन्हा दाखल करून ठेका रद्द करावा. बेकायदा कचरा वाहतूक व डंपिंग बंद करावे अशी मागणी सातत्याने नागरिकांची आहे. कचरा गाड्याच्या जवळून जाणे म्हणजे यमदूताच्या जवळ जाणे अशी भीती वाटते. पोलीस व आरटीओने कचरा गाड्या व चालकांवर कठोर कारवाई करावी. डोंगरी मार्गावर अवजड वाहनांना वेग मर्यादा निश्चित करावी.