उल्हासनगर महापालिका सत्तेचा तिढा सुटणार, २० एप्रिलला सभापती पदाची निवड
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2026 16:39 IST2026-04-13T16:38:44+5:302026-04-13T16:39:01+5:30
कोणाच्या गळ्यात पडणार स्थायी समितीची माळ?

उल्हासनगर महापालिका सत्तेचा तिढा सुटणार, २० एप्रिलला सभापती पदाची निवड
उल्हासनगर : महापालिकेतील महत्त्वाच्या स्थायी समिती आणि ९ विशेष समित्यांच्या सभापती पदाचा बिगुल अखेर वाजला आहे. येत्या २० एप्रिल रोजी या निवडणुका पार पडणार असून, त्यासाठी १५ एप्रिल रोजी अर्ज दाखल केले जाणार आहेत. राज्यात एकत्र असलेले भाजप आणि शिंदेसेना आता महापालिकेत सत्तेचे वाटप कसे करतात, याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.
उल्हासनगर महापालिका निवडणुकीत एकमेकांविरुद्ध शड्डू ठोकल्यानंतर, सत्तेसाठी भाजप आणि शिंदेसेना एकत्र आले. सध्या महापौरपद शिंदेसेनेच्या (ओमी कलानी गट) अश्विनी निकम यांच्याकडे, तर उपमहापौरपद भाजपकडे आहे. मात्र, तिजोरीच्या चाव्या मानल्या जाणाऱ्या स्थायी समिती सभापती पदासाठी दोन्ही पक्षांनी दावा ठोकला आहे. १६ सदस्यांच्या स्थायी समितीत भाजप आणि शिंदेसेना दोघांकडेही प्रत्येकी ८ सदस्य असल्याने पेच निर्माण झाला आहे.
१५ एप्रिल दुपारी ३ ते ५ वाजेपर्यंत सभापती पदासाठी अर्ज दाखल केले जाणार आहेत. तर २० एप्रिल सोमवार प्रत्यक्ष निवडणुका होणार आहेत. २० एप्रिल रोजी पीठासीन अधिकाऱ्यांमार्फत अर्जांची छाननी होईल. त्यानंतर १५ मिनिटे अर्ज मागे घेण्यासाठी वेळ दिली जाईल आणि मग प्रत्यक्ष मतदान किंवा घोषणा केली जाईल.
लॉटरी कोणाची लागणार?
शिंदेसेनेत इच्छुकांची संख्या मोठी असल्याने पेच निर्माण झाला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, पेच टाळण्यासाठी स्थायी समिती सभापती पद भाजपला, तर बहुतांश विशेष समिती सभापती पदे शिंदेसेनेला मिळण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.
बिनविरोध निवडीचे संकेत
भाजप आणि शिंदेसेना सत्तेत भागीदार असल्याने ही निवडणूक प्रत्यक्ष मतदानाऐवजी सर्वसंमतीने आणि बिनविरोध होण्याची चिन्हे आहेत. यासाठी दोन्ही पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये लवकरच महत्त्वाची बैठक पार पडणार आहे.
लहान पक्षांनाही मिळणार संधी?
केवळ मोठे पक्षच नव्हे, तर शिंदेसेनेसोबत असलेल्या वंचित बहुजन आघाडी, रिपाई व साई पक्षालाही प्रत्येकी एक महत्त्वाचे सभापती पद मिळण्याची शक्यता आहे. आपल्या पदरात सभापती पद पाडून घेण्यासाठी अनेक नगरसेवकांनी आतापासूनच वरिष्ठ नेत्यांकडे 'फिल्डिंग' लावण्यास सुरुवात केली आहे. १५ एप्रिलला नक्की कोणाचे अर्ज दाखल होतात, यावरून महापालिकेतील सत्तेचे नवीन समीकरण स्पष्ट होईल.