ठाणे : कळवा येथील शांताबाई चव्हाण (४०) या नाका कामगार महिलेच्या हत्येप्रकरणी विश्वजीत राजेंद्रप्रसाद सिंग (३०) आणि देवराज मदन कुमार या दोघांना अटक करण्यात आली आहे. कळवापोलिसांनी बुधवारी याची माहिती दिली. यामध्ये तिसऱ्या अल्पवयीन मुलालाही ताब्यात घेतले असून, त्याची भिवंडीतील बाल निरीक्षण गृहात रवानगी केली आहे.
हत्या करण्यात आलेल्या महिलेच्या अंगावरील काही दागिने आणि पाच हजार रुपये चोरल्याची कबूली आरोपींनी दिल्याची माहिती पोलिस निरीक्षक अनिल गायकवाड यांनी दिली.
१४ जून रोजी झाली होती हत्या
कळव्यातील कावेरी सेतू रस्त्यालगत बांधकाम चालू असलेल्या एका नवीन इमारतीमध्ये १४ जून २०२५ शांताबाई या महिलेची हत्या झाली होती. शस्त्राने वार करुन तसेच गळा आवळून तिचा खून केला गेला होता.
कळवा पोलीस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांची तीन पथके आरोपींचा शोध घेत होती. कळवा रेल्वे स्थानकापासून कुर्ला रेल्वे स्थानकापर्यंत एकूण शंभरच्या आसपास सीसीटीव्ही कॅमेऱ्यातील चित्रीकरणाची पोलिसांनी पडताळणी केली.
बिहारमध्ये जाऊन केली अटक
स्थानिक रिक्षा चालक, हॉटेल व्यावसायिकांकडे चौकशी करण्यात आल्यानंतर तीन आरोपी असल्याची बाब यात आढळली. आरोपी परराज्यात पळून गेल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांची पथके बिहार राज्यातील खगडीया जिल्ह्यात गेली. विश्वजीत सिंग आणि देवराज कुमार तसेच १७ वर्षाच्या एका अल्पवयीन मुलाला सहायक पोलीस निरीक्षक संतोष पिंपळे यांच्या पथकाने ताब्यात घेतले.
विश्वजीत आणि देवराज यांना १९ जून रोजी अटक केली. न्यायालयाने त्यांना १ जुलैपर्यंत पोलिस कोठडी दिली आहे. तिच्याकडील ३५ हजारांचे दागिने आणि पाच हजार रुपये अशा ४० हजारांसाठी तिची हत्या केल्याची त्यांनी कबूली दिली.
कळव्यातील सीमा हाईटस इमारतीमध्ये कामाच्या बहाण्याने त्यांनी या महिलेला नेले तिथेच तिची हत्या केली. आरोपींकडून देशी कट्टा आणि तीन जिवंत काडतुसेही हस्तगत केली आहेत.