ठाणे पोलिसांनी दिले नवरदेवाला जीवदान

By Admin | Updated: June 26, 2016 01:05 IST2016-06-26T01:05:03+5:302016-06-26T01:05:03+5:30

वेळ आली होती पण काळ आला नव्हता, याचा प्रत्यय कोपरी ब्रीजवर झालेल्या घटनेत आला. दुचाकी घसरून झालेल्या अपघातात जखमी अवस्थेत रक्ताचा थारोळ्यात पडलेल्या भावी नवरदेवाला

Thane police gave life to Nawarda | ठाणे पोलिसांनी दिले नवरदेवाला जीवदान

ठाणे पोलिसांनी दिले नवरदेवाला जीवदान

ठाणे : वेळ आली होती पण काळ आला नव्हता, याचा प्रत्यय कोपरी ब्रीजवर झालेल्या घटनेत आला. दुचाकी घसरून झालेल्या अपघातात जखमी अवस्थेत रक्ताचा थारोळ्यात पडलेल्या भावी नवरदेवाला ठाणे वाहतूक शाखेच्या पोलिसांनी प्रसंगावधान दाखवून तातडीने रुग्णालयात दाखल केल्याने त्याला जीवदान मिळाले. नवरदेवाच्या भावी पत्नीसह नातेवाइकांनी त्याबद्दल वाहतूक पोलिसांचे आभार मानले.
कांजूरगावातील रहिवासी असलेला भूषण पवार असे जीवदान मिळालेल्या नवरदेवाचे नाव आहे. भूषणचे लग्न दोन महिन्यांवर आल्याने त्यांच्या घरात लग्नाची तयारी सुरू झाली होती. तो ठाण्यात मित्रासोबत दुचाकीवरून लग्नाच्या खरेदीसाठी आला होता. त्याने दुचाकी कोपरीत येथे पार्क केली. परत निघाला तोवर पावसाने रस्ते ओलसर झाले होते. त्यातच तो कोपरी ब्रीजच्या वळणावर गोंधळला आणि ताबा सुटल्याने फुटपाथला धडकला. तो जखमी अवस्थेत पडल्याचे सहायक पोलीस निरीक्षक प्रमोद कांबळे यांनी पाहिले. त्यांनी पोलीस शिपाई बोडरे, जुवाटकर, हवालदार चव्हाण यांच्या मदतीने तातडीने शासकीय जीपमधून त्यास ठाणे सिव्हील रुग्णालयात नेले. बिनतारी संदेशाद्वारे संबंधित घटनेची माहिती रुग्णालय, वाहतूक विभाग आणि स्थानिक पोलिसांना दिली. यामुळे वाहतूककोंडीतून मार्ग काढत १० मिनिटांत रुग्णालयात त्याला दाखल करता आले. जास्त रक्तस्राव झाल्याने शस्त्रक्रियेसाठी त्याला दुसऱ्या रूग्णालयात दाखल करण्यात आले. शस्त्रक्रियेत त्याच्या डोक्याला ३५ टाके पडले असून त्याची प्रकृती सुधारत असल्याची माहिती कांबळे यांनी दिली. वाहतूक पोलिसांच्या कर्तव्यदक्षतेमुळे भूषणला जीवदान मिळाले. या कामगिरीबद्दल पोलीस उपायुक्त डॉ. रश्मी करंदीकर आणि सहायक पोलीस आयुक्त डी.आर. गीते यांनी त्यांचे अभिनंदन केले.

Web Title: Thane police gave life to Nawarda