-जितेंद्र कालेकर, ठाणे
ठाणे रेल्वे स्थानकातील प्लॅटफॉर्म क्रमांक एक, पश्चिमेकडील तिकीट खिडकीसमोरील मोकळी जागा आणि पिंपळेश्वर महादेव मंदिराच्या बाजूच्या जागेवर मध्यरात्रीपासून ते पहाटेपर्यत तरुणांचे टोळके बिनधास्तपणे गांजा आणि 'सोल्यूशन'ची नशा करीत असल्याचे 'लोकमत'च्या पाहणीत आढळले. या नशेखोरांच्या हाणामाऱ्या होतात आणि वारंवार त्यांना हुसकावूनही पुन्हा ते स्थानकातच पथारी पसरतात. नशेच्या आहारी गेलेल्यांपुढे हतबल झाल्याची कबुलीच रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानांनी दिली.
शनिवारी मध्यरात्री (२ ते ४:३० वाजता) प्रस्तुत प्रतिनिधीने ठाणे रेल्वे स्थानकासह परिसरात पाहणी केली असता, प्लॅटफॉर्म क्रमांक एकला लागूनच असलेल्या तिकीट खिडकीच्या समोरील मोकळ्या जागेत काही फिरस्ते आणि गर्दुल्ल्यांचे टोळके बिनधास्तपणे गांजा आणि सोल्युशन या अमली पदार्थांचे सेवन करीत होते. काहीजण नशेतच एकमेकांवर हल्ला करीत होते.
रात्रभरातून अनेक वेळा या नशेखोरांवर आपल्या 'स्टाइल'ने कारवाई करूनही हे नशेखोर आवाक्यात येत नसल्याची हतबलताही एका जवानाने व्यक्त केली. असाच प्रकार पहाटे चारच्या सुमारास रेल्वे स्थानकासमोरील पिंपळेश्वर महादेव मंदिराच्या बाजूला सुरू होता.
विनापरवाना पदार्थांची विक्री
ठाणे रेल्वे स्थानकासमोरील प्रीती स्नॅक्स सेंटर, कॅनन पावभाजी आदी खाद्यपदार्थांची विक्री करणाऱ्या अनेक हातगाड्या होत्या. मध्यरात्रीपासून ते सकाळपर्यंत त्या सुरू होत्या.
माजीवडा भागातही वर्दळ
माजीवडा पेट्रोल पंपाच्या बाजूला गणेश चायनीज, गणेश शोरमा सेंटर, गणेश डोसा हाऊस ही संगम मेडिकलच्या बाजूला असलेली खाद्यपदार्थ विक्री करणारी दुकानेही पहाटे ५:३० वाजेपर्यंत सुरू होती.
दुकान सुरू ठेवण्यासाठी पोलिस नाही; पण पॉलिटिक्स को मॅनेज करना पडता है, असे येथील शोरमा सेंटरच्या विक्रेत्याने सांगितले. हप्ता तर पोलिसांनाही द्यावा लागतो, असे येथील एका चायनीज विक्रेत्याने 'लोकमत'ला सांगितले.
रेल्वे स्थानक किंवा परिसरात जर अमली पदार्थ सेवनाचे प्रकार होत असतील, तर त्यावर निश्चितच कारवाई केली जाईल. या भागात गस्त वाढवून संबंधित रेल्वे निरीक्षकांना कारवाईचे आदेश दिले जातील.
-प्रज्ञा झेडगे, (पोलीस उपायुक्त, मध्य विभाग, रेल्वे)
काही समाजकंटक रिक्षा युनियनच्या नावाखाली रेल्वे स्थानक परिसरात आश्रय घेतात. भुर्जी पाव आणि चायनीजच्या गाड्याही लावतात. रेल्वे पोलिस, रेल्वे सुरक्षा दल आणि ठाणेनगर पोलिसांनी संयुक्तपणे कारवाई करण्याची अपेक्षा आहे.
-संजय वाघुले (ज्येष्ठ नगरसेवक, ठाणे शहर)
Web Summary : Thane station witnesses rampant drug use at night, with groups openly consuming ganja and 'solution.' Illegal food vendors also operate, allegedly managing police through payments. Authorities promise action against drug abuse and increased patrolling.
Web Summary : ठाणे स्टेशन पर रात में नशीली दवाओं का सेवन व्यापक रूप से होता है, जहाँ समूह खुले तौर पर गांजा और 'सॉल्यूशन' का सेवन करते हैं। अवैध खाद्य विक्रेता भी काम करते हैं, कथित तौर पर भुगतान के माध्यम से पुलिस का प्रबंधन करते हैं। अधिकारियों ने नशीली दवाओं के सेवन के खिलाफ कार्रवाई और गश्त बढ़ाने का वादा किया है।