शिवसेनेला मीनाताई ठाकरेंचा पुतळा उभारण्याचा विसर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2021 04:46 IST2021-09-15T04:46:07+5:302021-09-15T04:46:07+5:30

ठाणे : मासुंदा तलावाजवळील चौकात माजी पंतप्रधान राजीव गांधी यांचा पुतळा उभारण्यास मंजुरी देणाऱ्या सत्ताधारी शिवसेनेला माँसाहेब मीनाताई ठाकरे ...

Shiv Sena forgot to erect a statue of Meenatai Thackeray | शिवसेनेला मीनाताई ठाकरेंचा पुतळा उभारण्याचा विसर

शिवसेनेला मीनाताई ठाकरेंचा पुतळा उभारण्याचा विसर

ठाणे : मासुंदा तलावाजवळील चौकात माजी पंतप्रधान राजीव गांधी यांचा पुतळा उभारण्यास मंजुरी देणाऱ्या सत्ताधारी शिवसेनेला माँसाहेब मीनाताई ठाकरे यांचा अर्धपुतळा उभारण्याचा विसर पडल्याची टीका भाजपचे आमदार व जिल्हाध्यक्ष निरंजन डावखरे यांनी मंगळवारी केली. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यामुळेच शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांना २५ वर्षे सत्ता उपभोगता आली. मात्र, स्वर्गीय मीनाताई ठाकरेंचा अर्धपुतळा बसविण्यासाठी दिरंगाई केली जात असल्याचे ते म्हणाले.

माजी पंतप्रधान राजीव गांधी यांचा पुतळा उभारण्यासाठी दीड कोटी रुपये खर्चाच्या निविदा प्रक्रियेला ठाणे महापालिकेने सुरुवात केल्याचे वृत्त लोकमतने मंगळवारी प्रसिद्ध करताच भाजपने शिवसेेनेला मीनाताईंच्या पुतळ्यावरून घेरले आहे. यापूर्वी अनेक वर्षांपासून राजीव गांधींचा पुतळा उभारण्यास शिवसेनेकडून टोलवले जात होते. मात्र, आता महाविकास आघाडी सरकारच्या स्थापनेनंतर शिवसेनेला काँग्रेसविषयी ममत्व आल्याचा टोलाही त्यांनी लगावला. ठाण्यातील माँसाहेब मीनाताई ठाकरे चौकातच त्यांचा अर्धपुतळा उभारण्याचा प्रस्ताव होता. मात्र, त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. सुमारे २० वर्षांपासून चौकातील चबुतरा रिकामाच आहे. या ठिकाणी माजी आमदार स्वर्गीय अनंत तरे यांच्याकडून दरवर्षी ६ सप्टेंबर रोजी चौकातील चबुतऱ्यावर तात्पुरता अर्धपुतळा ठेवून आदरांजली वाहिली जात होती. या कार्यक्रमानंतर पुतळा काढण्यात येतो. यंदा मीनाताई ठाकरेंना २५ व्या स्मृतिदिनी आदरांजली वाहिली गेली. मात्र, त्यांचा अर्धपुतळा उभारण्यासाठी फुरसत मिळाली नाही. आता सत्तेसाठी माजी पंतप्रधान राजीव गांधींचा पुतळा उभारण्यासाठी शिवसेनेने लगबग सुरू केल्याची टीका त्यांनी केली.

Web Title: Shiv Sena forgot to erect a statue of Meenatai Thackeray