भाडेकपातीला रिक्षाचालकही सहमत

By Admin | Updated: October 13, 2016 03:29 IST2016-10-13T03:29:57+5:302016-10-13T03:29:57+5:30

डोंबिवली ते उल्हासनगर परिसरात चार सीएनजीपंप सुरू झाल्याने येथील रिक्षांचे भाडे दोन रुपयांनी कमी करण्याचा प्रस्ताव कल्याण आरटीओने परिवहन

The rickshaw driver also agreed on the lease | भाडेकपातीला रिक्षाचालकही सहमत

भाडेकपातीला रिक्षाचालकही सहमत

डोंबिवली : डोंबिवली ते उल्हासनगर परिसरात चार सीएनजीपंप सुरू झाल्याने येथील रिक्षांचे भाडे दोन रुपयांनी कमी करण्याचा प्रस्ताव कल्याण आरटीओने परिवहन विभागातील वरिष्ठांना पाठवला आहे. या भाडेकपातीला रिक्षाचालक-मालक युनियनच्या पदाधिकाऱ्यांचीही संमती आहे. परंतु, त्यासाठी अगोदर सीएनजीपंपांची संख्या वाढवा आणि नंतर भाडेकपात करा, असा पवित्रा त्यांनी घेतला आहे.
‘रिक्षाप्रवास दोन रुपये स्वस्त’ या शीर्षकाखाली शुक्रवारी ‘लोकमत’च्या हॅलो ठाणेमध्ये बातमी प्रसिद्ध झाली होती. त्यावर, कल्याण-डोंबिवलीतील युनियनच्या पदाधिकाऱ्यांनी वरील मत व्यक्त केले. सरकारचा निर्णय मान्यच असेल, पण त्यासाठी सीएनजीपंपांची संख्या वाढवायला हवी. कल्याण-डोंबिवलीत प्रत्येकी एक पंप आहे. तो अपुरा पडत आहे, असे रिक्षाचालक युनियनचे अध्यक्ष दत्ता माळेकर यांनी सांगितले.
कल्याणमध्ये शेअर रिक्षाभाड्यात आधीच कपात केली आहे. पुरेसे पंप झाल्यावर हकीम समितीच्या निकषांनुसार भाडेकपात करावी लागल्यास त्याचा सकारात्मक विचार केला जाईल. आधी निर्णय तर होऊ द्या, असे रिक्षा-टॅक्सीचालक-मालक असोसिएशनचे अध्यक्ष प्रकाश पेणकर यांनी सांगितले. रिपब्लिकन रिक्षा युनियनचे अध्यक्ष रामा काकडे यांनी सीएनजीपंप वाढवावेत, त्यानंतर सरकारच्या निर्णयाबाबत संघटना विचार करेल, असे मत व्यक्त केले.
सीएनजी आणि पेट्रोल-डिझेलच्या दरात फरक आहे, हे मान्य आहे. त्यानुसार, आता बहुतांशी रिक्षा सीएनजीवर झाल्या आहेत. पण, त्या प्रमाणात पंप नाहीत. हकीम समितीच्या निकषांच्या आधारे जो निर्णय होईल, तो मान्य असेल, असे डोंबिवलीतील लाल बावटा रिक्षा युनियनचे अध्यक्ष काळू कोमास्कर यांनी सांगितले. (प्रतिनिधी)

Web Title: The rickshaw driver also agreed on the lease