नवी मुंबई शहरात रुग्णवाढीचा दर कमी झाल्याने दिलासा, कोरोनामुक्तीच्या दिशेने वाटचाल

By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2021 09:37 AM2021-01-20T09:37:50+5:302021-01-20T09:41:48+5:30

शहरात १२ मार्च २०२०ला पहिला रुग्ण सापडला. मार्चमध्ये फक्त १० रुग्ण होते, त्यापैकी एकाचा मृत्यू झाला होता. एप्रिलपासून रुग्णसंख्या झपाट्याने वाढली होती. ऑगस्टमध्ये सर्वाधिक १०,७६४ जणांना लागण झाली होती.

Relief in the declining rate of outpatients in Navi Mumbai | नवी मुंबई शहरात रुग्णवाढीचा दर कमी झाल्याने दिलासा, कोरोनामुक्तीच्या दिशेने वाटचाल

नवी मुंबई शहरात रुग्णवाढीचा दर कमी झाल्याने दिलासा, कोरोनामुक्तीच्या दिशेने वाटचाल

Next

नवी मुंबई : महानगरपालिका कार्यक्षेत्रात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होऊ लागला आहे. रुग्णवाढीचा दर कमी झाला असून मृत्युदरही नियंत्रणात आला आहे. शून्य मृत्युदराचे उद्दिष्टही दृष्टिपथात येऊ लागले आहे. सक्रिय रुग्णांची टक्केवारीही १.५७ एवढी कमी झाली.

शहरात १२ मार्च २०२०ला पहिला रुग्ण सापडला. मार्चमध्ये फक्त १० रुग्ण होते, त्यापैकी एकाचा मृत्यू झाला होता. एप्रिलपासून रुग्णसंख्या झपाट्याने वाढली होती. ऑगस्टमध्ये सर्वाधिक १०,७६४ जणांना लागण झाली होती. सप्टेंबरमध्येही १०,५२४ जणांना प्रादुर्भाव झाला. जुलैमध्ये सर्वाधिक २०७ जणांचा मृत्यू झाला होता. नोव्हेंबरपासून रुग्णसंख्या कमी होण्यास सुरुवात झाली. डिसेंबरमध्ये २,७५१ जणांना लागण झाली व ६७ जणांचा मृत्यू झाला होता. जानेवारीमध्ये १८ दिवसांत फक्त १,१९८ जणांना लागण असून मृतांचा आकडा फक्त २४ आहे.

सद्य:स्थितीमध्ये सक्रिय रुग्णांची संख्या ८२० असून ते प्रमाण फक्त १.५७ एवढेच आहे. रुग्ण दुप्पट होण्याचे प्रमाण तब्बल ६३७ दिवसांवर पोहोचले आहे. महानगरपालिकेने केलेल्या उपाययोजनांमुळे रुग्ण संख्या कमी होण्यास मदत होत आहे. यामध्ये नागरी आरोग्य केंद्रांची भूमिकाही महत्त्वाची ठरत आहे. मनपा आयुक्त अभिजित बांगर हे स्वत: नागरी आरोग्य केंद्रांशी नियमित संवाद साधत आहेत. कोरोनामुळे कोणाचाही मृत्यू होऊ नये यासाठी प्रशासन प्रयत्न करत आहे.

जानेवारीतील तीन दिवसांत मृत्यू नाही
नवी मुंबई महानगरपालिकेने ब्रेक द चेन व शून्य मृत्युदर मोहीम सुरू केली आहे. या दोन्ही मोहिमांना यश येत आहे. शहरातील प्रत्येक नोडमधील रुग्णसंख्या नियंत्रणात येत आहे. जानेवारीतील तीन दिवसांत एकही मृत्यू झाला नाही. 

चिंचपाडासह इंदिरानगरमध्ये प्रत्येकी ३ रुग्ण
चिंचपाडा व इंदिरानगर नागरी आरोग्य केंद्राच्या कार्यक्षेत्रात प्रत्येकी ३ रुग्ण शिल्लक आहेत. दिघामध्ये ७ रुग्ण शिल्लक आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.३७ टक्के झाले आहे. सीबीडी, घणसोली व चिंचपाडामध्ये ९७ टक्क्यांपेक्षा जास्त रुग्ण बरे झाले आहेत.

कोरोनाचा आलेख 
महिना              रुग्ण              मृत्यू
मार्च                  १०                 ०१
एप्रिल               २२०              ०४
मे                   १,९७४             ६८
जून                ४,४०१            १३८
जुलै               ८,७८०            २०७
ऑगस्ट          १०,७६४          १७०
सप्टेंबर           १०,५२४          १६२
ऑक्टाेबर       ७,८४८           १५१
नोव्हेंबर         ३,७३०            ८३
डिसेंबर          २,७५१           ६७
जानेवारी        १,१९८            २४

Web Title: Relief in the declining rate of outpatients in Navi Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.