मीरारोड - गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात मराठी माणसांमध्ये मोठ्या प्रमाणात असंतोष निर्माण झाला आहे. मीरारोड परिसरात झालेल्या व्यापारी संघटनेच्या मोर्चाला प्रत्युत्तर म्हणून मराठी भाषिकांनी मोर्चाची हाक दिली. या मोर्चात राजकीय पक्षांसह सामाजिक संघटना, मराठी भाषिक जनता सहभागी होणार होती. परंतु पोलिसांकडून या मोर्चाला परवानगी नाकारण्यात आली. सोमवारी मध्यरात्रीपासून पोलिसांनी आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्या नेत्यांची धरपकड करण्यास सुरुवात केली. त्यात मनसेचे ठाणे पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव, मराठी एकीकरण समितीचे गोवर्धन देशमुख यांच्यासह इतरांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
आज सकाळी १० वाजता या मोर्चाला सुरुवात होणार होती. परंतु पोलिसांकडून दडपशाहीचा वापर करून मोर्चा रोखण्याचा प्रयत्न झाला असा आरोप आंदोलकांकडून केला जात आहे. त्यामुळे मीरारोडमधील परिस्थिती आणखी चिघळली आहे. रस्त्यावर पोलीस आणि आंदोलक यांच्यात झटापट पाहायला मिळाली. यात महिला आंदोलकांसह इतर आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले. या आंदोलनात छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेषात आलेल्या एका लहान मुलालाही पोलिसांनी अटक करू असं म्हटलं. ओमकार कर्पे असं या मुलाचे नाव आहे. तो सहावीत आहे. ओमकार म्हणाला की, तुला आणि तुझ्या घोड्यालाही ताब्यात घेईन असं पोलिसांनी मला म्हटले. मराठीसाठी पुन्हा आंदोलन करणार. मराठी सगळ्यांना आलीच पाहिजे असं त्याने म्हटलं.
मुख्यमंत्री काय म्हणाले?
मोर्चाला कुणी परवानगी मागितली तरी पोलीस परवानगी देतात. मी मीरारोडच्या पोलीस आयुक्तांना विचारले असता, त्यांची आयोजकांसोबत मोर्चाच्या मार्गाबाबत चर्चा सुरू होती. परंतु जाणीवपूर्वक मोर्चासाठी जो मार्ग मागत होते जेणेकरून संघर्ष होईल आणि याबाबत पोलिसांना काही इनपुट्स आले होते त्यात काही जण मोर्चात वेगळे काही करणार होते म्हणून पोलिसांनी परवानगी नाकारली. मनसेच काय, इतर कुणालाही मोर्चा काढायचा असेल तर परवानगी मिळेल परंतु आम्हाला इथेच मोर्चा काढायचा आहे. कायदा सुव्यवस्था बिघडवण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न झाला तर ते योग्य नाही. आपल्याला एकाच राज्यात एकत्रित राहायचे आहे. राज्याच्या विकास करायचा आहे. जर आंदोलकांनी योग्य मार्ग मोर्चासाठी मागितला तर ती परवानगी कधीही मिळेल, आजही आणि उद्याही मिळेल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं.
दरम्यान, मोर्चाला पोलिसांना परवानगी द्यायची नव्हती. जो मार्ग बदलायला सांगितला जात होता. मीरारोड येथे घटना घडली, व्यापारी संघटनेने मीरारोडला मोर्चा काढला आणि आम्हाला घोडबंदर रोडला मोर्चा काढायला पोलीस सांगत होते. मीरारोडच्या घटनेचा घोडबंदरला कोण मोर्चा काढते? याचा अर्थ तुम्हाला परवानगी द्यायची नव्हती. आमच्यावर गुन्हे दाखल करायचे असतील तर करावे. खोटी माहिती पसरवू नका. अख्ख्या महाराष्ट्रतला मराठी माणूस मीरारोड भाईंदरला निघाला आहे. मराठी माणसांना जेलमध्ये टाकायचे असेल तर टाकावे आता हे आंदोलन या मोर्चाला पोलीस परवानगी देत नाहीत तोवर सुरू राहणार असा इशारा मनसे नेते संदीप देशपांडे यांनी दिला.