ठाण्यातील रिक्षा चालकाच्या प्रामाणिकपणामुळे मोबाईल परत मिळाला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2018 21:57 IST2018-07-15T21:51:46+5:302018-07-15T21:57:07+5:30
रिक्षात विसरलेला मोबाईल प्रामाणिकपणे परत करणाऱ्या छोटेलाल यादव या रिक्षा चालकाचा वाहतूक नियंत्रण शाखेच्या कासारवडवली शाखेने शनिवारी विशेष सत्कार केला.

पोलिसांनी केला रिक्षा चालकाचा सत्कार
ठाणे : कासारवडवली येथील बालाजी साळवे या प्रवाशाचा रिक्षात विसरलेला मोबाइल प्रामाणिकपणे परत करणा-या छोटेलाल यादव या रिक्षाचालकाचा वाहतूक नियंत्रण शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रकाश पाटील यांनी शनिवारी विशेष सत्कार केला. आपला मोबाइल सुखरूप मिळाल्याने साळवे यांनीही समाधान व्यक्त केले.
ठाणे रेल्वेस्थानकाकडे जाण्यासाठी साळवे हे कासारवडवली येथून रिक्षाने शनिवारी दुपारी बसले होते. त्यावेळी रिक्षातच त्यांचा मोबाइल विसरला. साळवे रिक्षातून गेल्यानंतर हा मोबाइल यादव यांना मिळाला. त्यांनी सामाजिक कार्यकर्ते कुणाल मुकादम यांच्या मदतीने तो कासारवडवली वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पाटील यांच्याकडे सुपूर्द केला. हा मोबाइल साळवे यांचा असल्याची माहिती मिळाल्यानंतर ओळख पटवून पाटील यांनी त्यांना तो परत केला. तर, यादव यांच्या प्रामाणिकपणाबद्दल वाहतूक शाखेतर्फे पाटील यांनी त्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.