मीरा भाईंदरमध्ये मराठी माणसांच्या आणि मराठी भाषेच्या समर्थनात आज मंगळवारी काढला जाणारा 'मराठी मोर्चा' रोखण्यासाठी पोलिस अतिशय आक्रमक झाले आहेत. रात्रीपासून मोर्चात येणाऱ्यांच्या घरात घुसून धरपकड केली गेली. पोलिसांनी अनेकाना ताब्यात घेतले असून मोर्चाचे फलक उतरवले आहेत. इतकेच काय तर मोर्चाच्या ठिकाणी कोणी जमू नये म्हणून प्रचंड बंदोबस्त पोलिसांनी लावला आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
मीरा रोडच्या जोधपूर स्वीटचे मालक बाबुलाल चौधरी यांनी मराठी भाषा बोलण्यास नकार देतानाच महाराष्ट्रात सर्व भाषा बोलल्या जातात असे वक्तव्य केल्यावरून मनसेच्या कार्यकर्त्यांनी त्यांना मारहाण केली होती. या प्रकरणात काशीमीरा पोलिसांनी ७ मनसे कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करून प्रतिबंधात्मक कारवाई केली होती.
त्यानंतर विशेषतः राजस्थानी मारवाडी व्यापारी यांनी मारहाणीच्या निषेधार्थ दुकाने बंद ठेऊन मोर्चा काढला होता. मोर्चात मराठी माणसाना वठणीवर आणण्यासह अन्य आक्षेपार्ह्य वक्तव्ये केली गेली होती.
व्यापाऱ्यांच्या मोर्चाला भाजप आमदाराने दिला होता पाठिंबा
भाजपाच्या स्थानिक आमदार नरेंद्र मेहता यांनी व्यापाऱ्यास मारल्याचा निषेध करत आपण व्यापाऱ्यांसोबत आहोत असे म्हटले होते. मेहता हे मराठी द्वेष्टे असल्याचा आणि व्यापाऱ्यांना त्यांनी राजकीय फायद्यासाठी भडकावल्याचा आरोप मनसे, मराठी एकीकरण समिती आदींनी केला.
मराठी माणसांची एकजुटता व मराठी भाषा, मराठी माणसांवर होणाऱ्या अन्याय विरुद्ध ८ जुलै रोजी मीरारोड मध्ये मराठी माणसांचा मोर्चा काढण्याचे मनसे , शिवसेना ठाकरे गट, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आदी पक्ष सह मराठा समाज, विविध संघटना, संस्था यांनी जाहीर केले होते. मात्र पोलिस उपायुक्त प्रकाश गायकवाड यांनी मोर्चाला परवानगी नाकारली असल्याचे सांगत मोर्चा काढला, सोशल मीडियावर भडकावू पोस्ट केल्या तर कारवाईचा इशारा दिला होता. इतकेच काय तर मोर्चा जिकडून काढणार त्या ठिकाणी पोलिसांच्या मोठ्या फौजफाटा सह शक्ती प्रदर्शन करत मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
पोलिसांनी सोमवार पासून अनेकाना प्रतिबंधात्मक नोटीसा बजावल्या आहेत. एकाच व्यक्तीला विविध पोलिस ठाण्यातून नोटीसा बजावण्यात आल्या आहेत.
पोलिसांनी कोणाला घेतलं ताब्यात?
मराठी मोर्चा चे लागलेले फलक पोलिसांनी उतरवायला लावले आहेत. पोलिसांनी अनेकांच्या घरी रात्री घुसून धरपकड केली आहे. नवघर पोलिसांनी रात्रीच शिवसेना शिंदे गटाचे पवन घरत, मराठा समाजाचे मनोज राणे, मनसेचे अनिल रानावडे व जाधव आणि मराठी एकीकरण समितीचे सचिन घरत यांना त्यांच्या घरातून पकडून नवघर पोलीस ठाण्यात ताब्यात ठेवले आहे. या शिवाय अनेकांची धरपकड पोलिसांनी केली आहे. मनसेचे अविनाश जाधव यांना ताब्यात घेतले आहे.
"मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सरकार आणि त्यांचे पोलीस मराठी माणसांवर दादागिरी, दडपशाही करत आहेत. शहरात अनेक मोर्चे आंदोलन होऊन हजारोच्या संख्येने परप्रांतीय रस्त्यावर बेकायदा उतरतात तेव्हा का नाही इतकी तत्परता दाखवत? त्यांच्या घरी मध्यरात्री नंतर कुटुंबीयांवर दहशत करून ताब्यात घेण्यासाठी पोलीस का घुसत नाहीत कधी? मराठी माणसाच्या घरी अपरात्री घुसून त्यांना पकडतात", अशी टीका मराठी एकीकरण समिती अध्यक्ष गोवर्धन देशमुख यांनी केली.