मनसेचे नेते अविनाश जाधव यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात, पहाटे ३ वाजता कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2025 08:19 IST2025-07-08T08:18:04+5:302025-07-08T08:19:29+5:30
Avinash Jadhav: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ठाणे-पालघरचे जिल्हाप्रमुख अविनाश जाधव यांना ताब्यात घेतल्यानंतर काशिमीरा पोलीस ठाण्यात ठेवण्यात आले आहे.

मनसेचे नेते अविनाश जाधव यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात, पहाटे ३ वाजता कारवाई
Avinash Jadhav News: हिंदी सक्तीच्या मुद्द्याने वातावरण ढवळून निघालं आहे. काही दिवसांपूर्वी मराठी बोलण्यास नकार देणाऱ्या व्यापाराला मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी मारहाण केली होती. त्यानंतर मीरा भाईंदरमध्ये मोर्चा काढण्यात आला. याला प्रत्युत्तर म्हणून मनसेकडून आज मोर्चा काढण्यात येणार आहे. पण, त्यापूर्वीच पोलिसांनी धरपकड सुरू केली. मनसेचे ठाणे आणि पालघर जिल्हाप्रमुख अविनाश जाधव यांना पोलिसांनी मंगळवारी पहाटे ताब्यात घेतले.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
मीरा भाईंदरमध्ये अमराठी भाषिकांनी काढलेल्या मोर्चाला उत्तर म्हणून मनसेने मोर्चा काढण्याची घोषणा केली. आज हा मोर्चा निघणार आहे. पण, पोलिसांनी या मोर्चाला परवानगी आहे. मात्र, तरीही मोर्चा काढणारच अशी भूमिका मनसे घेतली. त्यानंतर पोलिसांनी मनसेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची धरपकड सुरू केली आहे.
नोटीस बजावली, घरातून जाऊन घेतलं ताब्यात
पोलिसांनी अविनाश जाधव यांना नोटीस बजावली होती. पण, ते मोर्चामध्ये जाण्यास ठाम असल्यानंतर पहाटे त्यांच्यावर कारवाई करण्यात आली.
पोलिसांनी अविनाश जाधव यांना मंगळवारी पहाटे ३ वाजता त्यांच्या घरी जाऊन ताब्यात घेतले. त्यानंतर अविनाश जाधव यांना काशिमीरा पोलीस ठाण्यात नेण्यात आले.
आज सकाळी १० वाजता हा मोर्चा मीरा भाईंदरमध्ये निघणार आहे. १० वाजता बालाजी हॉटेलपासून मोर्चाला सुरूवात होणार असून, मीरा रोड परिसरात त्याची सांगता होणार आहे.
हा मोर्चा निघणारच -अविनाश जाधव
पोलिसांनी परवानगी नाकारल्यानंतर बोलताना अविनाश जाधव म्हणाले, 'पोलिसांनी मीरा भाईंदरमधील मनसेच्या मोर्चाला परवानगी नाकारली. पण, मराठी आमची आई आहे आणि आईसाठी कोणताही गुन्हा घेण्यास आम्ही तयार आहोत. कोणत्याही दबावाला बळी पडणार नाही. हा मोर्चा नियोजित वेळेवर आणि ठिकाणी निघणारच आहे', असा इशारा अविनाश जाधव यांनी दिला आहे.