मराठी मोर्चात मंत्री प्रताप सरनाईकांना बॉटल फेकून मारली, जोरदार घोषणाबाजी; सरनाईक आल्यानंतर काय घडलं?
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2025 13:56 IST2025-07-08T13:54:21+5:302025-07-08T13:56:21+5:30
Pratap Sarnaik Latest News: मीरा रोड परिसरात मराठी मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात शिवसेनेचे मंत्री प्रताप सरनाईक सहभागी झाले. त्यावेळी त्यांच्याविरोधात घोषणा देण्यात आल्या आणि बॉटल फेकण्यात आली.

मराठी मोर्चात मंत्री प्रताप सरनाईकांना बॉटल फेकून मारली, जोरदार घोषणाबाजी; सरनाईक आल्यानंतर काय घडलं?
पोलिसांची परवानगी नसताना आणि धरपकड करण्यात आल्यानंतरही मीरा भाईंदरमध्ये मराठी मोर्चा काढण्यात आला. पोलिसांकडून करण्यात आलेल्या धरपकड कारवाईवर संताप व्यक्त करत शिवसेनेचे मंत्री प्रताप सरनाईक मोर्चात सहभागी झाले. पण, मोर्चाच्या ठिकाणी येताच त्यांच्याविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. त्यांना पाण्याची बॉटल फेकून मारण्यात आली. त्यानंतर प्रताप सरनाईक मोर्चातून निघून गेले. या घटनेनंतर सरनाईकांनी उबाठा आणि मनसेवर टीका केली.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
मीरा भाईंदर येथे मराठी मोर्चा काढण्यात आला. मराठी एकीकरण समितीसह विविध राजकीय पक्षाच्या नेत्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी या मोर्चात सहभाग घेतला. मोर्चाआधी पोलिसांनी केलेल्या धरपकडीबद्दल संताप व्यक्त करत मंत्री प्रताप सरनाईक या मोर्चात सहभागी झाले.
प्रताप सरनाईकांच्या दिशेने भिरकावली बॉटल
मंत्री प्रताप सरनाईक यांनी पोलिसांना अटक करण्याचे आव्हान देत मोर्चात सहभाग घेतला. पण, मोर्चाच्या ठिकाणी पोहोचताच प्रताप सरनाईक यांच्याविरोधात काही आंदोलकांनी घोषणाबाजी केली. प्रताप सरनाईक गो बॅक, जय गुजरात अशा घोषणा आंदोलकांनी सरनाईकांविरोधात दिल्या.
मराठा एकीकरण समितीचे प्रमुख गोवर्धन देशमुख यांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. त्यांना घेऊन सरनाईक मोर्चात सहभागी झाले. त्यावेळी घोषणाबाजी करत एका व्यक्तीने त्यांच्या दिशेने पाण्याची बॉटल फेकून मारली. त्यानंतर गोंधळ निर्माण झाला. पोलिसांनी त्यांना तातडीने गर्दीतून बाहेर नेले. त्यानंतर ते परत निघून गेले.
प्रताप सरनाईकांची मनसे, ठाकरेंच्या शिवसेनेवर टीका
"ज्यांना राजकारण करायचं आहे, त्यांना राजकारण करू द्या. पंरतु, बाहेरची लोक शहरात येऊन गोंधळ घालण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे अशा पद्धतीने बेकायदेशीरित्या पोलिसांनी कुणाला अटक केली असेल, तर प्रताप सरनाईक सहन करणार नाही. हे उबाठा आणि मनसेचे राजकारण चालूच राहणार आहे. पण, शेवटी प्रताप सरनाईक मीरा भाईंदर शहरातील मराठी लोकांसाठी आहे, हे सिद्ध झाले आहे", असे प्रताप सरनाईक म्हणाले.
मनसेचे नेते अविनाश जाधव या घटनेबद्दल बोलताना म्हणाले की, 'अशी कुठली घटना घडली असेल, तर ती चुकीचे आहे. मी सकाळपासून त्यांना ऐकतोय. त्यांची भूमिका मला आवडली. मोर्चाचा आयोजक म्हणून मला ही घटना आवडलेली नाही.'