Vidhan Sabha 2019: ...अन्यथा मतदानावर बहिष्कार टाकू; रहिवाशांचा संताप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2019 01:44 AM2019-09-23T01:44:56+5:302019-09-23T01:45:31+5:30

ठाकुर्ली उड्डाणपूल परिसरातील रस्त्यांचे रुंदीकरण, जागा देण्यास विरोध

Maharashtra Vidhan Sabha 2019 otherwise boycott voting | Vidhan Sabha 2019: ...अन्यथा मतदानावर बहिष्कार टाकू; रहिवाशांचा संताप

Vidhan Sabha 2019: ...अन्यथा मतदानावर बहिष्कार टाकू; रहिवाशांचा संताप

Next

डोंबिवली : ठाकुर्ली उड्डाणपूल परिसरातील वाहतूक सुरळीत होण्यासाठी तेथील रस्ते रुंदीकरणाचे प्रयत्न केडीएमसी प्रशासनाने सुरू केले असताना त्याला स्थानिक रहिवाशांनी तीव्र विरोध केला आहे. जागा देण्यास नकार दिला असून घराच्या बांधकामाला हात लावला, तर विधानसभा निवडणुकीच्या मतदानावर बहिष्कार घालू, असा पवित्रा शनिवारी रहिवाशांकडून घेण्यात आला. दरम्यान, प्रशासन त्यांच्या भूमिकेवर ठाम असून मार्किंग केल्याप्रमाणे रुंदीकरण होणार असल्याचे स्पष्टीकरण त्यांच्याकडून देण्यात आले.

डोंबिवली शहरातील कोपर उड्डाणपूल दुरुस्तीसाठी बंद केल्याने पूर्व-पश्चिम वाहतुकीसाठी एकमेव पर्याय राहिलेल्या ठाकुर्ली उड्डाणपुलावर वाहतुकीचा ताण वाढला आहे. याठिकाणी वाहतूक वाढल्याने येथील काही रस्त्यांवरील वाहतूक एकदिशा करण्यात आली आहे, तर पी १ पी २ पार्किंगची अंमलबजावणीही चालू करण्यात आली आहे. शुक्रवारी केडीएमसीचे आयुक्त गोविंद बोडके यांनी या परिसराची पाहणी केली. वाहतूकव्यवस्था व नियोजनाच्या अनुषंगाने केलेल्या पाहणी दौऱ्यात बेकायदा पार्किंग बंद करून रस्ते रुंदीकरण करण्यासाठी तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना केल्या. त्यानुसार, अधिकाºयांनी ठाकुर्ली उड्डाणपुलालगतचे पूर्वेकडील संभाजी पथ आणि छेडा क्रॉस रोड रुंदीकरणाची कार्यवाही सुरू केली आहे. या रुंदीकरणासाठी घरे आणि अन्य बांधकामांवर मार्किंग केले आहे. हे दोन्ही रस्ते नऊ मीटर असून ते आणखीन तीन मीटरने वाढवायचे असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे. यात इमारतींच्या संरक्षक भिंतींसह दोन्ही रस्त्यांच्या मध्यावर असलेल्या वसाहतीमधील २० घरांवरही रुंदीकरणाचा हातोडा पडणार आहे.
रुंदीकरणाला स्थानिक रहिवाशांनी तीव्र विरोध केला आहे. वाहतूककोंडीच्या समस्येला प्रशासनाचा नियोजनशून्य कारभारच कारणीभूत आहे. ठाकुर्ली उड्डाणपुलाचे नियोजनच चुकीचे झाले आहे.

पूल जोशी हायस्कूलजवळ जो उतरवण्यात आला आहे, ती जागाच चुकीची आहे. याआधी ९० फूट रस्त्यावर पूल उतरवला जाणार होता, पण तेथील घरे वाचवण्यासाठी जोशी हायस्कूल परिसराचा घाट घालण्यात आला. आधीच अरुंद असलेल्या रस्त्यांवर पूल उतरवण्याआधी वाहतूककोंडी होणार, याची जाणीव प्रशासनाला झाली नव्हती का? असे सवाल रहिवाशांनी उपस्थित केले आहेत. आम्ही ६० ते ७० वर्षांपासून याठिकाणी राहत आहोत. आमची जागा रुंदीकरणासाठी देणार नाही. आमच्या घराच्या बांधकामातील एका विटेला जरी धक्का लागला, तरी विधानसभा निवडणुकीच्या मतदानावर बहिष्कार टाकू, असा पवित्रा रहिवाशांनी घेतला आहे. शनिवारी रात्री झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

निवडणुकांमध्ये मतांचा जोगवा मागणारे आम्हाला न्याय देतील का, याकडेही त्यांनी लक्ष वेधले आहे. दरम्यान, रहिवाशांच्या विरोधानंतरही प्रशासन रुंदीकरण करण्याच्या भूमिकेवर ठाम असल्याने प्रशासन आणि रहिवासी यांच्यात संघर्ष पेटण्याची चिन्हे आहेत.

लवकरच नोटिसा काढणार
दोन्ही रस्त्यांवर रुंदीकरण होणे आवश्यक आहे, त्याप्रमाणे मार्किंग करण्यात आले आहे. त्यानुसारच, रुंदीकरण होईल. या कार्यवाहीसाठी लवकरच रुंदीकरणात बाधित होणाºयांना नोटिसा काढल्या जातील, अशी माहिती ‘फ’ प्रभागक्षेत्र अधिकारी दीपक शिंदे यांनी दिली.

Web Title: Maharashtra Vidhan Sabha 2019 otherwise boycott voting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.