कल्याण हादरले: सासूने मित्राच्या मदतीने सुनेची केली हत्या, वालधुनी पुलाच्या खाली फेकला मृतदेह, हत्येचं कारण काय?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2026 16:55 IST2026-01-04T16:53:34+5:302026-01-04T16:55:12+5:30
Kalyan Crime news: मित्राच्या मदतीने सासूने सुनेची हत्या केल्याची घटना समोर आली आहे. हत्येनंतर सुनेचा मृतदेह वालधुनी पुलाच्या खाली फेकण्यात आला होता. पोलिसांनी दोघांना अटक केली असून, हत्येचे कारण समोर आले आहे.

कल्याण हादरले: सासूने मित्राच्या मदतीने सुनेची केली हत्या, वालधुनी पुलाच्या खाली फेकला मृतदेह, हत्येचं कारण काय?
६० वर्षाच्या महिलेने ३५ वर्षीय सुनेची हत्या केल्याच्या घटनेने कल्याणमध्ये खळबळ उडाली आहे. सासूने सून बेपत्ता असल्याची तक्रार पोलीस ठाण्यात दाखल केली होती. शोध सुरू असताना पोलिसांना वालधुनी पुलाच्या खाली रक्तबंबाळ अवस्थेत सुनेचा मृतदेह सापडला. पोलिसांनी अधिक तपास केल्यानंतर महिलेची हत्या सासुनेच केली असल्याचे समोर आले.
रुपाली विलास गांगुर्डे (वय ३५) असे हत्या करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे. लताबाई नाथा गांगुर्डे (वय) असे सासुचे नाव आहे. १ जानेवारी रोजी रुपाली यांची हत्या करण्यात आली.
सासुने सुनेची हत्या का केली?
रुपाली यांच्या हत्येचे कारण म्हणजे पैसे आणि नोकरी. रुपाली यांचे पती विलास गांगुर्डे हे रेल्वेमध्ये नोकरीला होते. सप्टेंबर २०२५ मध्ये त्यांचा मृत्यू झाला. निधनानंतर रुपाली यांना ९ ते १० लाख रुपये ग्रॅच्युएटी मिळाली.
हे पैसे सासू लताबाई रुपालीकडे मागत होती. रुपाली पैसे देण्यास नकार देत होती. त्याचबरोबर विलास गांगुर्डे यांच्या निधनानंतर अनुकंप तत्त्वावर आपल्याला नोकरी मिळाली अशी लताबाई गांगुर्डेची इच्छा होती. पण, रुपाली यांनी पत्नी म्हणून अनुकंप तत्त्वावर नोकरी मिळावी, यासाठी अर्ज केला. त्यामुळे दोघींमध्ये वाद सुरू झाले.
मित्राच्या मदतीने केली सून रुपालीची हत्या
सासू लताबाई हिने तिचा मित्र जगदीश म्हात्रे (वय ६०) याच्यासोबत रुपाली यांच्या हत्येचा कट रचला. रुपाली यांच्या डोक्यात रॉड मारला आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर त्यांनी रुपाली यांचा मृतदेह वालधुनी पुलाखाली फेकला.
हत्येचा आरोप आपल्यावर येऊ नये म्हणून सासूने पोलीस ठाण्यात जाऊन सून बेपत्ता असल्याची तक्रार दिली. त्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला. पोलिसांना रुपाली यांचा मृतदेह रक्तबंबाळ अवस्थेत सापडला. पोलिसांना सासूवर शंका आली. त्यानंतर लताबाई हिला ताब्यात घेतले आणि पोलीस खाक्या दाखवताच सासूने हत्येची कबुली दिली. त्यानंतर पोलिसांनी तिला अटक केली.