मराठी भाषा वाढवा, पण इंग्रजीचीही कास धरा

By Admin | Updated: October 13, 2016 03:33 IST2016-10-13T03:33:17+5:302016-10-13T03:33:17+5:30

आताच्या काळात इंग्रजी भाषेची आवश्यकता असून ती जगात सर्वांना मान्य असलेली भाषा आहे, असे स्पष्ट प्रतिपादन साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाचे उमेदवार

Increase Marathi language, but also hold English language | मराठी भाषा वाढवा, पण इंग्रजीचीही कास धरा

मराठी भाषा वाढवा, पण इंग्रजीचीही कास धरा

डोंबिवली : आताच्या काळात इंग्रजी भाषेची आवश्यकता असून ती जगात सर्वांना मान्य असलेली भाषा आहे, असे स्पष्ट प्रतिपादन साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाचे उमेदवार आणि कवितांचे समीक्षक डॉ. अक्षयकुमार काळे यांनी बुधवारी केले. मराठी ही आपली मातृभाषा असून ती शाळांशाळांमध्ये कशी वाढीस लागेल याचा विचार होणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले.
इंग्रजीच्या वाढत्या प्रभावामुळे मराठी भाषेचे विकृतीकरण होत असल्याच्या प्रा. प्रवीण दवणे यांच्या भूमिकेसंदर्भात ते बोलत होते. दवणे हेही अध्यक्षपदाचे अन्य उमेदवार आहेत. डोंबिवलीतील ९० व्या साहित्य संमेलनाचा मीच अध्यक्ष होणार असून भाषा, साहित्य, संस्कृती संवर्धनासाठी आतापर्यंत मी योगदान दिले असून यापुढेही ते अधिकाधिक वृद्धींगत कसे होईल याकडे लक्ष देणार आहे, असे प्रतिपादन त्यांनी केले. दवणे यांनीही गेल्याच आठवड्यात नियंत्रक संस्थेच्या कार्यक्रमाला हजेरी लावल्यानंतर काळे यांनीही अध्यक्षपदासाठी दावा केल्यानंतर काळे यांनीही बुधवारी डोंबिवलीत आगरी युथ पोरमच्या पदाधिकाऱ्यांची भेट घेतली आणि पत्रकारांसमोर आपली भूमिका मांडली.
सकारात्मक जीवनदृष्टी, निकोप साहित्यदृष्टी व तीक्ष्ण समीक्षादृष्टी हे साहित्यातले महत्वाचे गुण असून ते माझ्या लेखणीतून सर्वांनी सातत्याने अनुभवले आहेत. जेथे संमेलन होत आहे तेथे जाऊन तेथील साहित्य संपदेसह समाजरचनेचा आढावा घेण्यासाठी मुद्दामच डोंबिवलीत आल्याचे त्यांनी सांगितले. संमेलनात केवळ साहित्य वृद्धीसाठीच योगदान दिले जावे. युवकांची साहित्यातील अभिरुची कशी वाढीस लागेल, याकडे लक्ष देणे आवश्यक आहे, अशी अपेक्षा काळे यांनी व्यक्त केली. संमेलनाचा खर्च पाच कोटींवर जाणार असल्याची माहिती मीही ऐकली आहे. त्या संदर्भातील सर्व जबाबदारी आयोजकांची असते. पण मी अध्यक्ष झालो तर संस्कृती, समाजभान, परंपरा आदींना महत्व देईल. त्याला बगल न देता साजेसे संमेलन पार पडण्यावर भर देईन, अशी भूमिकाही त्यांनी घेतली.
काळे यांची साहित्यसंपदा, त्यांनी भूषवलेली वेगवेगळी पदे यांची माहिती यावेळी देण्यात आली. (प्रतिनिधी)

Web Title: Increase Marathi language, but also hold English language