The idols of the goddess also got rain | देवीच्या मूर्तींनाही बसला पावसाचा फटका
देवीच्या मूर्तींनाही बसला पावसाचा फटका

- प्रज्ञा म्हात्रे

ठाणे : यावर्षीच्या अतिवृष्टीचा फटका देवीच्या मूर्तींनाही बसला आहे. आधीच कमी दिवस आणि त्यात पावसाच्या तडाख्यामुळे मूर्ती सुकवण्याकरिता मूर्तिकारांची तारेवरची कसरत सुरू आहे. पावसामुळे मूर्ती सुकत नसल्याने कोळशाची भट्टी आणि हॅलोजनचा वापर करून मूर्ती सुकवल्या जात आहेत. अनेक मूर्तिकारांनी मनुष्यबळ वाढवले आहे.

नवरात्रोत्सव आठवडाभरावर आला आहे. मूर्तिकारांकडे अवघे पाच-सहा दिवस आहेत. परंतु, गेल्या काही दिवसांपासून दिवसरात्र कोसळत असलेल्या पावसाचा फटका देवीच्या मूर्तींना बसला आहे. पाच दिवसांच्या गणपतींचे विसर्जन झाले की, देवीच्या मूर्तिकामास सुरुवात होते. मूर्ती साच्यातून काढून रंगकाम केले जाते. पावसाने थैमान घातल्याने मूर्ती सुकवण्यास मूर्तिकारांना नाना शक्कल लढवायला लागल्या आहेत. त्यामुळे अर्थातच रंगकामासही उशिरा सुरुवात झाली आहे. भाविकांना मूर्ती वेळेत पूर्ण करून देण्यासाठी काही मूर्तिकारांनी कामाचे तास वाढवले आहेत, तर काहींनी नेहमीपेक्षा दुपटीने मनुष्यबळात वाढ केली आहे. कोळशाची भट्टी मूर्तीखाली ठेवून तसेच, चारही बाजूंनी हॅलोजन लावून मूर्ती सुकवल्या जात आहेत.

अनेकांनी शुक्रवारपासून रंगकामास सुरुवात केली आहे. मूर्ती पूर्ण सुकल्याशिवाय रंगकाम करता येत नाही. त्यामुळे मूर्तिकारांना तारेवरची कसरतच करावी लागत आहे. गणेश विसर्जन झाले की, ऊन पडते त्यामुळे मूर्ती बाहेर ठेवल्या तरी त्या लगेच सुकतात. यंदा मात्र उलट परिस्थिती असल्याची नाराजी मूर्तिकारांनी व्यक्त केली. बेस कलर, बॉडी टोन, कपड्यांचा रंग, मग दागिने रंगविणे अशा टप्प्यांत रंगकाम केले जाते. गणेशमूर्तीपेक्षा देवीच्या मूर्ती बारकाईने रंगवल्या जातात आणि तुलनेने ते काम अवघड असते, असे पल्लवी गावकर यांनी सांगितले.

रंग महागल्याने मूर्तींच्या दरांत वाढ
रंग आणि कच्च्या मालाच्या दरात वाढ झाल्याने गेल्या वर्षी १५ हजार रुपये दराने मिळणारी मूर्ती यंदा १८ ते २० हजार रुपये दराने मिळत आहे. कामगारांची मजुरी वाढली आहे. हल्ली मूर्ती बनविणारे कामगार मिळणे कठीण झाल्याने ते मागतील ती मजुरी द्यावी लागते. त्यामुळे दररोज ५०० रुपये मजुरी घेणारे कामगार हे ७०० ते १००० रुपये मागत असल्याचे गावकर यांनी सांगितले.

यंदा हातात कमी दिवस असल्याने आणि पावसामुळे मूर्ती सुकण्यास खूप अडचणी येत असल्याने दरवर्षीपेक्षा यंदा कमीच प्रमाणात मूर्ती आणल्या आहेत.
- अरुण बोरीटकर,
मूर्तिकार

पावसामुळे मूर्तीचा खर्च कमी आणि कोळशांचा खर्च जास्त आहे. मूर्ती सुकवण्यासाठी आतापर्यंत ७० किलो कोळसा लागला आहे.
- पल्लवी गावकर,
मूर्तिकार

Web Title: The idols of the goddess also got rain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.