गौरींचे आगमन थाटात

By Admin | Updated: September 20, 2015 00:04 IST2015-09-20T00:04:27+5:302015-09-20T00:04:27+5:30

शनिवारी सर्वत्र गौरी आणि महालक्ष्मींचे मोठ्या थाटामाटात आगमन झाले. या दोघीही माहेरवाशीण म्हणून त्यांचा बंधू असलेल्या गणरायाकडे येतात. अशी भाविकांची श्रद्धा आहे.

Gauri's arrival was in the situation | गौरींचे आगमन थाटात

गौरींचे आगमन थाटात

ठाणे : शनिवारी सर्वत्र गौरी आणि महालक्ष्मींचे मोठ्या थाटामाटात आगमन झाले. या दोघीही माहेरवाशीण म्हणून त्यांचा बंधू असलेल्या गणरायाकडे येतात. अशी भाविकांची श्रद्धा आहे. ग्रामीण भागात हिरवी गौर किंवा वृक्ष गौर, निसर्ग गौर या रुपात गौरींचे आगमन झाले. ज्यांच्याकडे मूर्तीच्या स्वरुपात गौर बसते त्यांच्याकडे तिचे मिरवणुकीने वाजतगाजत आगमन झाले. तर ज्यांच्याकडे महालक्ष्मींची स्थापना होते. त्यांच्याकडे पारंपारिक साठे सजवून त्यावर पारंपारिक पितळी अथवा शाडू किंवा प्लास्टर आॅफ पॅरिसचे मुखवटे ठेवून त्यांची स्थापना झाली.
ज्यांच्याकडे महालक्ष्मीच्या स्वरुपात स्थापना झाली. त्यांनी तिचे मुखवटे दारातून घरात आणून लक्ष्मी आली सोन्याच्या पावलाने, लक्ष्मी आली रुप्याच्या पावलाने, लक्ष्मी आली मोत्याच्या पावलाने असा गजर करीत त्यांची स्थापना केली. ज्यांच्याकडे दरवर्षी विसर्जित करावयाच्या मूर्तीच्या रुपात गौरीची स्थापना होते. त्यांनी सकाळपासूनच ही मूर्ती घरी नेण्यासाठी चित्रशाळा किंवा विक्रेत्यांच्या दुकानासमोर गर्दी केली होती. चारचाकी हातगाडी किंवा वाहन सजवून त्यातून गौर नेतांना बॅन्जो, ढोल पथक, ताशे यांचा गजर करीत समोर महिला नृत्य करीत होत्या.
आज गौरींच्या आगमनाचा दिवस असून उद्या त्यांचा महानैवेद्य होईल. तर सोमवारी त्यांचे विसर्जन होईल. गौरींच्या आगमनामुळे हार, फुले, वेण्या, गजरे, गुलाबाची फुले, सोनचाफ्याची फुले, शेवंती, मोगरा याचे भाव आज चांगलेच कडाडले होते. उद्या सर्वपूजा साहित्याचे आणि फुलांचे भाव आणखीनच वधारलेले असतील. अशी प्रतिक्रिया विक्रेत्यांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केली.
तर त्यांच्यासमोर ठेवल्या जाणाऱ्या पाच फराळांच्या ताटांमुळे चकली, शेव, अनारसा, करंजी, साठोरी, लाडू या घरगुती फराळांच्या वस्तूंचे भावही चांगलेच वधारले होते. अनेक ठिकाणी या दुकानांसमोर रांगाही लागल्या होत्या. आगरी व कोळी समाजात गौरी स्थापनेचा जल्लोष आगळा-वेगळाच असतो. ती आणत असतांना तिच्यापुढे त्यांच्याकडून होणारे नृत्य बघणे हा देखील वेगळाच आनंद असतो. (प्रतिनिधी)

Web Title: Gauri's arrival was in the situation