भाजप पदाधिकाऱ्यामुळे माजी IPS अधिकाऱ्याने स्वतःवर झाडली गोळी; कोट्यवधींच्या फसवणुकीत पंजाब पोलिसांकडून अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2026 13:24 IST2026-01-02T13:14:39+5:302026-01-02T13:24:52+5:30
पंजाबमधील अधिकाऱ्याने फसवणुकीला कंटाळून स्वतःला संपवण्याचा प्रयत्न केला.

भाजप पदाधिकाऱ्यामुळे माजी IPS अधिकाऱ्याने स्वतःवर झाडली गोळी; कोट्यवधींच्या फसवणुकीत पंजाब पोलिसांकडून अटक
IPS Amar Singh Chahal: शेअर बाजारात मोठा नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून पंजाबमधील निवृत्त आयपीएस अधिकारी अमर सिंह चहल यांची ८ कोटी १० लाख रुपयांची सायबर फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या आर्थिक फसवणुकीला कंटाळून चहल यांनी स्वतःवर गोळी झाडून आत्महत्येचा प्रयत्न केला. या प्रकरणाचे धागेदोरे थेट महाराष्ट्रातील मीरा-भाईंदर शहरात पोहोचले असून, पंजाब पोलिसांनी भाजप युवा मोर्चाचा पदाधिकारी शेरा ठाकूर आणि त्याच्या साथीदारांना ताब्यात घेतले आहे.
८ कोटींचा गंडा आणि १२ पानांची सुसाईड नोट
निवृत्त आयपीएस अधिकारी अमर सिंह चहल यांनी सोमवारी पटियाला येथील राहत्या घरी स्वतःच्या छातीत गोळी झाडून घेतली. पोलिसांनी घटनास्थळावरून पंजाबच्या पोलीस महासंचालकांच्या नावे लिहिलेली १२ पानांची सुसाईड नोट जप्त केली आहे. यामध्ये त्यांनी 'एफ-७७७ डीबीएस वेल्थ इक्विटी रिसर्च ग्रुप' नावाच्या व्हॉट्सॲप आणि टेलिग्राम ग्रुपद्वारे आपली कशी फसवणूक झाली, याची सविस्तर माहिती दिली होती. आरोपींनी डीबीएस बँकेचे नाव वापरून खोटा डॅशबोर्ड तयार केला आणि चहल यांना मोठ्या नफ्याचे आभासी चित्र दाखवून तब्बल ८ कोटी १० लाख रुपये हडपले.
मीरा रोडमध्ये पंजाब पोलिसांची मोठी कारवाई
चहल यांनी सुसाईड नोटमध्ये केलेल्या आरोपांनंतर पंजाब पोलीस तातडीने महाराष्ट्रात दाखल झाले. त्यांनी मिरा-भाईंदरच्या नवघर पोलिसांच्या मदतीने भाजप पदाधिकारी शेरा ठाकूर याला भाईंदर पूर्व भागातून ताब्यात घेतले. शेरा ठाकूर आणि त्याच्या टोळीच्या बँक खात्यांमध्ये कोट्यवधी रुपयांचे संशयास्पद व्यवहार झाल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. या टोळीत पांडे नावाचा एक कुख्यात बुकी देखील सहभागी असून, हे रॅकेट क्रिकेट सट्टा आणि सायबर फसवणुकीशी संबंधित असल्याचे समोर येत आहे.
प्रकृती चिंताजनक; ३ तास चालली शस्त्रक्रिया
स्वतःवर गोळी झाडून घेतल्यानंतर चहल यांना गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. गोळी फुफ्फुसात अडकल्यामुळे त्यांच्यावर सुमारे तीन तास गुंतागुंतीची शस्त्रक्रिया करण्यात आली. सध्या त्यांची प्रकृती अत्यंत नाजूक असून त्यांना अतिदक्षता विभागात डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे.
राजकीय वर्तुळात भूकंप; मेहता आणि ठाकूर यांचे कनेक्शन?
या प्रकरणाने आता राजकीय वळण घेतले आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी या प्रकरणावर गंभीर दावा केला आहे. शेरा ठाकूर हा भाजपचे माजी आमदार नरेंद्र मेहता यांच्या भावाचा व्यावसायिक भागीदार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. सत्ताधारी पक्षाशी संबंधित पदाधिकाऱ्याचे नाव अशा मोठ्या सायबर गुन्ह्यात आल्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
सायबर गुन्हेगारांची नवी पद्धत
आरोपींनी सुरुवातीला चहल यांचा विश्वास जिंकण्यासाठी बनावट ट्रेडिंग प्लॅटफॉर्म तयार केला. गुंतवणुकीवर मोठा नफा दिसत असल्यामुळे चहल यांनी पैसे गुंतवणे सुरू ठेवले. मात्र, जेव्हा त्यांनी पैसे काढण्याचा प्रयत्न केला, तेव्हा सर्व्हिस टॅक्स आणि अतिरिक्त शुल्काच्या नावाखाली त्यांच्याकडून आणखी कोट्यवधी रुपये उकळण्यात आले. पंजाब पोलीस सध्या शेरा ठाकूर आणि त्याच्या साथीदारांची कसून चौकशी करत असून, या आंतरराज्य सायबर रॅकेटमध्ये आणखी कोणाकोणाचे हात गुंतलेले आहेत, याचा शोध घेत आहेत.