कर्जाच्या विवंचनेतून जिगरबाज दोघींना गवसली आत्मनिर्भरतेची दिशा; कथा रेखा आणि प्रज्ञाच्या चिकाटीची

By ऑनलाइन लोकमत | Published: December 4, 2020 12:58 AM2020-12-04T00:58:17+5:302020-12-04T00:58:32+5:30

अवघ्या २०० रुपयांतून खर्च भागविणे शक्य नसल्याने त्यांनी मंगळवारपासून सकाळी ७ ते सकाळी १० वाजेपर्यंत नाक्यांवर जाऊन पोहे, चहा विकण्याचे काम सुरू केले आहे. घरातून निघतानाच त्या पोहे आणि चहा बनवून निघतात.

The direction of self-reliance that Jigarbaaz found in debt relief; The story line and the persistence of wisdom | कर्जाच्या विवंचनेतून जिगरबाज दोघींना गवसली आत्मनिर्भरतेची दिशा; कथा रेखा आणि प्रज्ञाच्या चिकाटीची

कर्जाच्या विवंचनेतून जिगरबाज दोघींना गवसली आत्मनिर्भरतेची दिशा; कथा रेखा आणि प्रज्ञाच्या चिकाटीची

Next

ठाणे : लॉकडाऊनच्या काळात पतीचा मृत्यू झाल्यानंतर फायनान्स कंपनीने कर्जफेड करण्यासाठी लावलेल्या तगाद्यामुळे विवंचनेत सापडलेल्या दोन महिला परिस्थितीशी दोन हात करुन आत्मनिर्भर  झाल्या. दोन मुलांचे पोट भरून या दोघी रिक्षाचे कर्ज फेडत आहेत. 
सरकारने बँका आणि फायनान्स कंपन्यांना लॉकडाऊनच्या काळात हप्ते न घेण्याचे निर्देश दिलेले असतानाही बँकांची कर्जवसुली सुरूच आहे. त्यामुळे कर्ज फेडण्यासाठी दिव्यात राहणाऱ्या रेखा पाटील नऊ तास रिक्षा चालवतात. याशिवाय सकाळच्या वेळेत तीनचार तास नाक्यानाक्यांवर रिक्षा उभी करून चहा-नाश्ता विकण्याचे कामदेखील त्यांनी सुरू केले. प्रज्ञा साळुंखे यांनीदेखील रिक्षा चालवून चहा-नाश्ता विक्री करण्याचे काम सुरू केले आहे.

रेखा पाटील यांना दोन मुले आहेत. एक दहावी आणि दुसरा बारावीत आहे. त्यांचे पती राजेंद्र एका खासगी कंपनीत कामाला होते. लॉकडाऊनमध्येच त्यांचा मृत्यू झाला. त्यामुळे सर्व जबाबदारी रेखाच्या खांद्यावर आली. पतीच्या पगारात घरखर्च भागत नव्हता म्हणून त्यांनी त्यांच्या हयातीतच कर्ज काढून अबोली रिक्षा घेतली. आधी सर्व व्यवस्थित सुरू होते. मात्र, पतीचे हृदयविकाराने निधन झाल्यामुळे त्यांची रिक्षा पाचसहा महिने बंद ठेवावी लागली. आता दोन महिन्यांपासून ती सुरू केली असली, तरी दिवसाला फक्त २००-३०० रुपयेच कमाई होत आहे. त्यातून घरात किती खर्च करायचे? बँकेचे हप्ते कसे भरायचे? मुलांची फी कशी द्यायची? गाडीचा मेंटेनन्स कसा ठेवायचा आणि आरटीओच्या कारवाईला कसे सामोरे जायचे? असे अनेक प्रश्न त्यांच्यासमोर उभे आहेत. त्यातच, फायनान्स कंपनीकडून कर्जाच्या हप्त्यांसाठी वारंवार अपमानित करणारे फोन येत आहेत. या थकलेल्या हप्त्यांवर चक्रवाढ व्याज लावले आहे. त्याचे १५ हजार ४०४ रुपये झाले आहेत. त्यामुळे दंड भरायचा की हप्ते भरायचे, असे संकट त्यांच्यासमोर आहे. अवघ्या २०० रुपयांतून खर्च भागविणे शक्य नसल्याने त्यांनी मंगळवारपासून सकाळी ७ ते सकाळी १० वाजेपर्यंत नाक्यांवर जाऊन पोहे, चहा विकण्याचे काम सुरू केले आहे. घरातून निघतानाच त्या पोहे आणि चहा बनवून निघतात.

अशीच परिस्थिती नितीन कंपनी परिसरात राहणाऱ्या प्रज्ञा साळुंके यांची आहे. पती सुनील कर्करोगाने त्रस्त असल्याने ते घरीच असतात. त्यांचा मुलगा बारावीत शिकतोय. घराची जबाबदारी त्यांच्याच खांद्यावर आहे. कोरोनामुळे त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे. कर्ज काढून रिक्षा घेतली असल्याने बँकेकडून होणारा त्रास सहन न झाल्याने स्वत:चे सगळे दागिने विकून त्यांनी रिक्षाचे हप्ते फेडले. आता रिक्षाच्या कमाईतून घरखर्च, पतीचे औषधोपचार आणि मुलाच्या शिक्षणाचा खर्च झेपेनासा झाल्याने त्यांनीसुद्धा रेखासोबत नाश्ता विकायला सुरुवात केली. दोघीही सकाळी रिक्षा घेऊन बाहेर पडतात. रिक्षास्टॅण्ड आणि नाक्यांवर रिक्षा उभ्या करून नाश्ता विकतात. त्यातून मिळणारा नफा दोघी वाटून घेतात. मंगळवारी त्यांना यात नफा झाला नाही, पण बुधवारी २०० रुपयांची कमाई झाली, असे त्या दोघींनी सांगितले.

कर्जाचे सर्व हप्ते भरण्यास तयार आहे. पण, कमाईच होत नाही. लॉकडाऊनच्या काळात थकलेल्या हप्त्यांवर व्याज-दंड लावला आहे. इतर खर्च भागवून तो आणि हप्ते कसे भरायचे? पती होते तेव्हा आधार होता. बँकेकडून हप्त्यांसाठी वाईट संभाषणाचे फोन येतात. गाडी चालवत असताना फोन कट केला, तर वाईट मेसेज पाठवितात. कोरोना काळातील सगळे हप्ते सर्व व्यवहार सुरळीत झाल्यानंतर वसूल करावेत. आरटीओनेदेखील आमच्या गाडीच्या पासिंगची फी माफ करावी.- रेखा पाटील, रिक्षाचालक

Web Title: The direction of self-reliance that Jigarbaaz found in debt relief; The story line and the persistence of wisdom

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.