Coronavirus News: Commissioner's public apology in Thane body exchange case | Coronavirus News: ठाण्यातील मृतदेहांची अदलाबदल प्रकरणी अखेर आयुक्तांचा जाहीर माफीनामा

ओळख पटवूनच दिला जाणार मृतदेहाचा ताबा

ठळक मुद्देदोषी असलेल्या एकाची उचलबांगडी तर दुसऱ्या डॉक्टरवर बडतर्फीची कारवाई चार परिचारिकांनाही केले बडतर्फओळख पटवूनच दिला जाणार मृतदेहाचा ताबा

लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : ठाण्यातील ग्लोबल हब रुग्णालयातील कोराना रुग्णांच्या मृतदेह अदलाबदल प्रकरणी पालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी सोनवणे आणि गायकवाड कुटूंबियांची जाहिर माफी मागितली. याप्रकरणी कोविड रुग्णालयाचे डॉ. योगेश शर्मा यांची बदली करून चार परिचारिकांना निलंबित केले आहे. याशिवाय यापुढे ओळख पटवूनच मृतदेह ताब्यात देण्यात येणार असल्याची माहिती आयुक्त शर्मा यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली.
गेल्या संपूर्ण एक आठवड्यापासून सुरू असलेल्या मृतदेह अदलाबदल प्रकरणावर महापालिका तसेच राजकीय वर्तुळातून टीकेची झोड उठविण्यात आली. राज्यपाल डॉ. भगतसिंह कोश्यारी यांनीही याप्रकरणी कारवाईचे संकेत भाजपासह सोनवणे आणि गायकवाड कुटूंबियांना गुरुवारी दिले. त्यापाठोपाठ आयुक्तांनी पत्रकार परिषदेचे आयोजन करून दिलगिरी व्यक्त करण्याबरोबरच वैद्यकीयदृष्टया पालिकेची कोणतीही चुक नसल्याचीही सारवासारव केली. तांत्रिकदृष्टया हा प्रकार घडल्यामुळे संबंधितांवर आपण कारवाई करीत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. यानुसार अधिष्ठाता डॉ. योगेश शर्मा यांची अन्यत्र बदली केली असून त्यांच्या जागी डॉ. अनिरु द्ध माळगावकर यांना नेमले आहे. यापुढे मात्र, आयसीएमआरच्या मार्गदर्शक तत्वांचे पालन करून रुग्ण व्यवस्थापनामध्ये कोणतीही चूक होणार नाही. याची पालिका प्रशासनाकडून खबरदारी घेतली जाणार आहे.
* रुग्णाच्या फाईलवर त्याचे छायाचित्र लावणार
कोणत्याही रुग्णाला रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्याच्या फाईलवर दर्शनी भागात त्याचे छायाचित्र लावले जाणार आहे. तसेच डिजिटल हँड ब्रँड प्रक्रियादेखील सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे उपचार करतांना किंवा दुर्दैवाने मृत्यू झालाच तर अदलाबदल सारखे प्रकार होणार नाहीत, असेही त्यांनी स्पष्ट केले.
...........................
मृत्यूदर कमी करण्यावर भर
औषधांबरोबर काही इंजेक्शनचा तुटवडा असल्याचे बोलले जात असल्याबाबतच्या प्रश्नावर आयुक्त डॉ. शर्मा म्हणाले, सध्या तरी पुरेसा औषधांचा साठा आहे. शहरातील कंटेनमेंट झोनमध्ये अत्याधुनिक यंत्रणेद्वारे घरोघरी जाऊन कर्मचाऱ्यांमार्फत सर्व्हेक्षण केले जात आहे. यात नागरिकांचे ताप, आॅक्सिजनचे प्रमाणही तपासले जात असल्यामुळे त्याचा चांगला परिणाम जाणवू लागला असल्याचे त्यांनी सांगितले. जास्तीत जास्त तपासण्या करून कोरोनाग्रस्तांची वाढती आकडेवारी समोर येत असली तरी रुग्ण बरे करण्यावर आणि मृत्यूदर कमी करण्यावर आपला भर असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यासाठी पालिका आयुक्तांपासून कर्मचाºयापर्यंत सर्वच अधिकारी कर्मचारी तसेच वैद्यकीय अधिकारी कर्मचारी वर्ग मेहनत घेत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. यावेळी काही आकडेवारी सादर करूनमहापालिकेने कोविड रुग्णांसाठी तसेच रुग्ण संख्या नियंत्रणात आणण्यासाठी केलेल्या कामाचीही माहिती त्यांनी पत्रकारांना दिली.

Web Title: Coronavirus News: Commissioner's public apology in Thane body exchange case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.