ठाणे : भार्इंदरपाडा येथे एकाच ठिकाणी सर्व धर्मीयांसाठी स्मशानभूमी बांधण्याच्या पालिकेच्या प्रस्तावाला जाहीर विरोध करून नगरसेवक पूर्वेश सरनाईक अडचणीत आले आहे. याबाबत लक्ष्यवेधी सूचना मांडण्याच्या त्यांच्या प्रस्तावाला विरोधकांनीही पाठिंबा दिलेला नाही. सत्ताधारी शिवसेनेतूनही तिला विरोध झाल्याने ही लक्ष्यवेधी बारगळण्याची चिन्हे आहेत. शिवसेनेच्या व्यासपीठावर आधी भूमिका न मांडता थेट जाहीर भूमिका घेतल्याने आणि अन्य ठिकाणच्या स्मशानभूमीचा विषय उपस्थित करून काही व्यक्तींना अडचणीत आणण्याच्या त्यांच्या प्रयत्नांमुळे ही लक्ष्यवेधी कोंडीत सापडल्याचे बोलले जाते. ठाणे पालिकेने या स्मशानभूमीचा प्रस्ताव तयार करून तो पहिल्याच महासभेच्या पटलावर मंजुरीसाठी ठेवायचे ठरवले आहे. ज्या जागेमध्ये ही स्मशानभूमी बांधण्याचा प्रस्ताव आहे, ती जागा सरनाईक यांच्या विहंग ग्रूप कंपनीच्या जागेत येत आहे. तेथे कंपनीच्या गृहप्रकल्पाचे कामही सुरु आहे. त्यामुळे या मागणीला पाठिबा न मिळता उलट या स्मशानभूमीचा मुद्दा मार्गी लावावा, अशी मागणी राष्ट्रवादीने पालिकेकडे एका पत्राद्वारे केली आहे. तसेच सत्ताधारी मंडळीही लक्ष्यवेधीत मांडण्यात आलेल्या स्वहिताच्या मुद्द्यावरुन अडचणीत सापडली आहेत. या स्थितीत लक्ष्यवेधीवर चर्चा झाली तर अनेकांच्या व्यावसायिक हितसंबंधांचे मुद्दे जाहीररित्या चचर््ोला येतील. विरोधक शिवसेनेला अडचणीत आणतील. प्रशासनही काही बाजू उघड करेल, शिवसेनेतील काही जाणत्या नेत्यांनी दाखवून दिल्याने या लक्ष्यवेधीवर चर्चाच न करण्याचा निर्णय जवळपास झाल्याचे बोलले जाते. तसे झाले तर तो सरनाईकांना घरचा आहेर असेल. त्यामुळे यापुढे स्वहिताचे मुद्दे जाहीररित्या न काढणे आणि पक्षाच्या व्यासपीठावर काही मुद्द्यांवर आधी चर्चा करण्याची सवय त्यांना करून घ्यावी लागेल, असा सल्ला शिवसेनेतील नेत्यांनी त्यांना खासगीत दिल्याचे कळते. (प्रतिनिधी)
स्मशानभूमीची लक्षवेधी अंगलट
By admin | Updated: March 20, 2017 02:04 IST