बदलापूर पुन्हा हादरले; स्कूलबसमध्ये अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग, विधान परिषदेत विरोधक आक्रमक
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2026 06:36 IST2026-02-28T06:35:03+5:302026-02-28T06:36:09+5:30
Badlapur Crime: एका नामांकित खासगी शाळेतील विद्यार्थिनीला घरी सोडताना चालकाने बसमध्ये विद्यार्थिनीचा विनयभंग केला.

बदलापूर पुन्हा हादरले; स्कूलबसमध्ये अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग, विधान परिषदेत विरोधक आक्रमक
बदलापूर : बदलापूरमध्ये अल्पवयीन विद्यार्थिनीचा स्कूलबसमध्ये चालकाने विनयभंग केल्याची संतापजनक घटना घडली. याप्रकरणी बदलापूर पश्चिम पोलिसांनी आरोपी जयेश मुने यास अटक केली आहे. तर कल्याण न्यायालयाने त्याला २ मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
एका नामांकित खासगी शाळेतील विद्यार्थिनीला घरी सोडताना चालकाने बसमध्ये विद्यार्थिनीचा विनयभंग केला. पीडितेने पालकांना घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर त्यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.
पोलिसांनी पोक्सो आणि अॅट्रॉसिटी कायद्यांतर्गत बसचालकावर गुन्हा दाखल केला आहे. काही दिवसांपूर्वी बदलापूरमध्ये स्कूलव्हॅनमध्ये विद्यार्थिनीचा विनयभंग झाला होता. विशेष म्हणजे गुरुवारीच राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी बदलापूरचा दौरा करत शाळेच्या सुरक्षेबाबत आढावा घेतला होता.
विधान परिषदेत विरोधक झाले आक्रमक
व्हॅन चालकाकडून मुलीचा विनयभंग झाल्याचे पडसाद शुक्रवारी विधान परिषदेत उमटले. पूर्वी अशी घटना बदलापूरमध्येच घडली होती यातून सरकारने बोध घेतला नाही का, अशी टीका विरोधकांनी केली.
उद्धवसेनेचे आ. सचिन अहिर यांनी स्थगन प्रस्ताव मांडला. शालेय बससाठी नियमावली जाहीर झाली असली तरी प्रत्यक्षात शोषणाच्या घटना थांबलेल्या नाहीत. सरकारचा धाक नसल्याने असे प्रकार वाढीस लागले आहेत, असा आरोप त्यांनी केला.
मंत्री शंभूराज देसाई यांनी आरोपीला तातडीने अटक केल्याची माहिती दिली. शालेय वाहनांसाठी एसओपी लागू असून नियमभंग करणाऱ्यांवर वाहतूक पोलिसांमार्फत कठोर कारवाई केली जात आहे.
महिला मदतनीस नसलेल्या वाहनांची माहिती घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच, दोषींवर कठोर कारवाई होईल, असे आश्वासन त्यांनी दिले. मात्र, विरोधकांनी गदारोळ घातल्याने सभापती प्रा. राम शिंदे यांनी या विषयावरील लक्षवेधी लवकरच चर्चेसाठी आणली जाईल, असे सांगितले.