Aditya Thackeray: राज्यात हिंदी शिकवण्याच्या मुद्द्यावरुन वाद पेटलेला असताना मराठीच्या मुद्द्यावरुन मारहाणीच्या घटना घडत आहेत. मीरा रोडमध्ये दुकानदाराने मराठी बोलण्यास नकार दिल्यानंतर मनसे कार्यकर्त्यांनी त्याला मारहाण केली होती. त्यानंतर शेजारीच असलेल्या ठाण्यात हिंदी भाषिकांनी ठाकरे गटाच्या एक शिवसैनिकाला बेदम मारहाण केली. त्यानंतर ठाकरे गटाचे नेते राजन विचारे यांनी हिंदी भाषिकांना त्यांच्या कार्यालयात बोलवून माफी मागायला लावली. यानंतर आता ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी या प्रकरणावर भाष्य केलं आहे. ठाण्यातील ही घटना मराठी -अमराठी वादाची नव्हती असं आदित्य ठाकरे म्हणाले.
ठाणे रेल्वे स्थानक परिसरातील एका मोबाईल दुकानामध्ये ग्राहक आणि दुकानामधील कर्मचाऱ्यांमध्ये मोबाईल चार्जिंगला लावण्यावरुन वाद झाला होता. यावेळी दुकानातील हिंदी भाषिक कर्मचाऱ्यांनी ग्राहकाला बेदम मारहाण केली. मारहाण झालेली व्यक्ती हा ठाकरे गटाचा पदाधिकारी असल्याचे समोर आलं. मारहाणीनंतर शिवसैनिकाने राजन विचारे यांच्याकडे याबाबत तक्रार केली. त्यानंतर राजन विचारे यांनी मारहाण करणाऱ्यांना त्यांच्या कार्यालयात बोलवून जाब विचारला. यावेळी राजन विचारे यांनी कर्मचाऱ्यांना शिवसैनिकाचे पाय पकडून माफी मागायला लावली. त्यानंतर मारहाण झालेल्या शिवसैनिकाने राजन विचारेंसमोरच दुकानदाराच्या कानशिलात लगावली. या दोन्ही घटनेचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले.
या सर्व वादावर शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली. "त्या व्हिडीओनंतर मी राजन विचारे यांना फोन करुन माहिती घेतली. त्यांनी सांगितले की हा विषय मराठी-अमराठीचा किंवा कोणत्याही जातीवादाचा नाही. ठाण्यातील आमच्या पदाधिकारी व्यक्तीला पाच सहा लोकांकडून फोन चार्जिंगवरुन मारहाण झाली. त्यावरुन बाचाबाची झाली. त्या व्यक्तीने आधी मारहाण केली. चार ते पाच जणांनी त्यांना मारहाण केली. एका महिलेने त्यांना वाचवलं. समोर हात उचलल्यानंतर प्रतिक्रिया दिली. ते वैयक्तिक भांडण होते," असं आदित्य ठाकरे म्हणाले.
"यामध्ये कुठेही मराठी-अमराठीचा वाद नव्हता. मी आधीही सांगितले आहे की, जे लोक महाराष्ट्रात आले आहेत, त्यांना मराठी येत नसेल, तर त्यांच्याविरोधात काहीही भूमिका नाही. पण हिंदीसक्तीच्या विरोधात आम्ही लढत असून, त्याविरोधात आम्ही लढत राहू. प्रत्येक राज्यामध्ये त्या-त्या मातृभाषेचा मान राखलाच पाहिजे. कोणी त्याचा अपमान करू नये, असंही आदित्य ठाकरे म्हणाले.