OnePlus बंद होणार? अफवांना पूर्णविराम! कंपनीचे सीईओ रॉबिन लियू यांनी दिले स्पष्टीकरण; म्हणाले, "आम्ही..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2026 12:44 IST2026-01-21T12:44:34+5:302026-01-21T12:44:56+5:30
OnePlus बंद होण्याच्या बातम्या चुकीच्या आहेत. OnePlus इंडियाचे CEO रॉबिन लियू यांनी स्पष्ट केले आहे की कंपनीचे कामकाज पूर्वीप्रमाणेच सुरू राहील. वाचा सविस्तर.

OnePlus बंद होणार? अफवांना पूर्णविराम! कंपनीचे सीईओ रॉबिन लियू यांनी दिले स्पष्टीकरण; म्हणाले, "आम्ही..."
गेल्या काही दिवसांपासून तंत्रज्ञान विश्वात OnePlus ब्रँड बंद होणार आणि त्याचे Oppo मध्ये पूर्णपणे विलीनीकरण होणार, अशा बातम्यांनी धुमाकूळ घातला होता. मात्र, आता स्वतः कंपनीने यावर मौन सोडले आहे. OnePlus इंडियाचे सीईओ रॉबिन लियू यांनी या सर्व बातम्या फेटाळून लावल्या असून ग्राहकांना मोठा दिलासा दिला आहे.
काही आंतरराष्ट्रीय मीडिया रिपोर्ट्समध्ये दावा करण्यात आला होता की, OnePlus आता HTC किंवा LG प्रमाणे स्मार्टफोन मार्केटमधून बाहेर पडणार आहे. यावर स्पष्टीकरण देताना रॉबिन लियू यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' (ट्विटर) वर पोस्ट केली. त्यांनी म्हटले की, "OnePlus इंडियाबद्दल काही चुकीचे समज आणि अफवा पसरवल्या जात आहेत. आम्ही पूर्वीप्रमाणेच सक्रियपणे काम करत आहोत आणि भविष्यातही आमचे कामकाज असेच सुरू राहील."
अँड्रॉइड हेडलाईन्सचा रिपोर्टनुसार, Oppo आता OnePlus वरील आपला खर्च कमी करण्यासाठी हा ब्रँड बंद करणार असल्याचे म्हटले होते. भारतात एकेकाळी टॉपवर असलेला हा ब्रँड सध्या पहिल्या ५ कंपन्यांच्या यादीत नसल्याने या अफवांना बळ मिळाले होते.
भविष्यातील मॉडेल्स: काही तज्ज्ञांच्या मते, आगामी 'OnePlus 16' हा या ब्रँडचा शेवटचा फोन असू शकतो, असा अंदाज वर्तवला जात होता. मात्र, सीईओंच्या विधानानंतर या सर्व चर्चांना आता पूर्णविराम मिळाला आहे.
ग्राहकांसाठी आनंदाची बातमी
कंपनीने स्पष्ट केले आहे की, भारतीय बाजारपेठ त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. सध्याचे युजर्स आणि नवीन खरेदी करू इच्छिणाऱ्या ग्राहकांनी घाबरण्याचे कारण नाही. सर्व्हिस, सॉफ्टवेअर अपडेट्स आणि नवीन लॉन्चिंगचे वेळापत्रक नियोजित वेळेनुसारच पार पडेल.