Ai Summit: गलगोटिया युनिव्हर्सिटीला स्टॉल रिकामा करण्याचे आदेश; चीनचा रोबोट आपला म्हणून दाखविला
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2026 11:47 IST2026-02-18T11:45:57+5:302026-02-18T11:47:15+5:30
Galgotia University, China Robot Row: दिल्लीतील इंडिया एआय इम्पॅक्ट समिटमध्ये चिनी रोबोडॉगला स्वतःचे सांगणे गलगोटिया विद्यापीठाला नडले. सरकारने स्टॉल रिकामे करण्याचे दिले आदेश. वाचा सविस्तर.

Ai Summit: गलगोटिया युनिव्हर्सिटीला स्टॉल रिकामा करण्याचे आदेश; चीनचा रोबोट आपला म्हणून दाखविला
नवी दिल्ली: नवी दिल्लीत सुरू असलेल्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये गलगोटिया युनिव्हर्सिटीच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. चिनी बनावटीचा रोबोडॉग स्वतः विकसित केल्याचा दावा करणे विद्यापीठाला महागात पडले असून, सरकारी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार विद्यापीठाला प्रदर्शनातून तात्काळ बाहेर जाण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!
नेमके प्रकरण काय?
गलगोटिया युनिव्हर्सिटीने या समिटमध्ये 'ओरियन' नावाचा एक रोबोटिक कुत्रा प्रदर्शित केला होता. विद्यापीठाच्या प्रतिनिधींनी आणि एका प्रोफेसरने प्रसारमाध्यमांशी बोलताना हा रोबोट त्यांच्या 'सेंटर ऑफ एक्सलन्स'ने विकसित केल्याचा दावा केला होता. मात्र, सोशल मीडियावरील जागरूक युजर्सनी अवघ्या काही तासांतच या दाव्याची पोलखोल केली. हा रोबोट प्रत्यक्षात चीनच्या 'Unitree' कंपनीचा 'Go2' मॉडेल असल्याचे समोर आले, जो ऑनलाइन खरेदीसाठी सहज उपलब्ध आहे.
ब्रँड इंडियाच्या प्रतिमेला धक्का?
एकीकडे भारत तंत्रज्ञान क्षेत्रात स्वावलंबी होण्याचे स्वप्न पाहत असताना, सरकारी पाठबळ असलेल्या उच्चस्तरीय समिटमध्ये परदेशी तंत्रज्ञान स्वतःचे म्हणून मिरवणे ही बाब प्रशासनाने अत्यंत गंभीरपणे घेतली आहे. यामुळे समिटच्या विश्वसनीयतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ नये, यासाठी सरकारकडून विद्यापीठाला स्टॉल रिकामे करण्यास सांगण्यात आले आहे.
विद्यापीठाची बाजू:
वादाचे स्वरूप वाढल्यानंतर विद्यापीठाने एक प्रसिद्धीपत्रक काढून स्पष्ट केले की, "आम्ही हा रोबोडॉग बनवल्याचा दावा केला नाही. हा विद्यार्थ्यांच्या शिकण्यासाठी आणलेला एक टूल आहे." मात्र, व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये विद्यापीठाचे कर्मचारी थेट 'डेव्हलप्ड बाय गलगोटिया' असे म्हणताना दिसत असल्याने त्यांचा हा बचाव कुचकामी ठरला आहे.