आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2025 19:53 IST2025-10-03T19:42:19+5:302025-10-03T19:53:38+5:30
सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.

अंबिका अशोक आम्बीगार
Solapur Crime : चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा खून करण्याच्या तीन घटना मंगळवारी व बुधवारी सोलापुरात घडल्या आहेत. माळशिरस तालुक्यातील येळीव येथे चारित्र्याच्या संशयावरून दारूच्या नशेत पत्नीला मारहाण करून गळा आवळून खून केला. दुसऱ्या घटनेत मोहोळ तालुक्यातील नजीक पिंपरीजवळ पत्नीच्या मानेवर कोयत्याने वार करून खून करण्यात आला, तर तिसऱ्या घटनेत दक्षिण सोलापूर तालुक्यातील औराद येथे चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा खून करून पतीनेही आत्महत्या केली आहे.
आशाबाईचा गळा दाबून खून
माळशिरस तालुक्यातील येळीव येथे आरोपी महादेव नवगिरे याची पहिली पत्नी मयत असून आशाबाई निळे या महिलेचा पहिला पती ही मयत आहे. आरोपी महादेव नवगिरे व मयत आशाबाई निळे या दुसऱ्या पत्नीसोबत येळीव काळा मारुती येथे राहत होते. आरोपी महादेव नवगिरे हा चारित्र्याच्या संशयावरून सतत आशाबाई हीस मारहाण करीत होता. चारित्र्याच्या संशयावरून या दोघांमध्ये वाद झाला. महादेव नवगिरे याने आशाबाई निळे हिला मारहाण करून गळा दाबून खून केला.
अंबिकाच्या डोक्यात पहारीने हल्ला
दुसऱ्या घटनेत औराद येथे नशेत चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा लोखंडी पहारीने डोक्यात मारून आणि खुरप्याने गळा चिरून खून करण्यात आला. अंबिका अशोक आम्बीगार असे मृत पत्नीचे नाव असून अशोक सदाशिव आम्बिगार असे पतीचे नाव असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दारूची नशा उत्तरल्यानंतर पती अशोक यानेही गळफास घेऊन जीवन संपविले.
सुनीताच्या मानेवर कोयत्याने वार
तिसऱ्या घटनेत मोहोळ तालुक्यातील नजीक पिंपरीजवळ अनैतिक संबंधाच्या संशयावरून पतीने कोयत्याने पत्नीच्या मानेवर वार करून खून केल्याची घटना घडली. सुनीता दर्शन वाणी (२८) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी पती दर्शन सूर्यभान वाणी (रा. कातनेश्वर, ता. पूर्णा, जि. परभणी) याच्याविरुद्ध मोहोळ पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. परभणी येथील मकवान तोडणारी टोळी बालाजी बापूराव वाघमोडे यांच्या शेतामध्ये मकवान कापण्याचे काम करीत होती. त्याच टोळीत दर्शन वाणी (रा. कातनेश्वर ता. पूर्णा जि. परभणी) हे पत्नी सुनीता वाणी हे काम करत होते.