चंद्रभागेच्या पात्रात पाणी पोहोचले

By Admin | Updated: July 6, 2014 01:26 IST2014-07-06T01:26:43+5:302014-07-06T01:26:43+5:30

स्नानाची सोय; खड्ड्यांचा अंदाज येत नसल्याने पात्र बनले धोकादायक

Water in the Chandrabhag area | चंद्रभागेच्या पात्रात पाणी पोहोचले

चंद्रभागेच्या पात्रात पाणी पोहोचले


पंढरपूर : आषाढी यात्रेसाठी पंढरीत येणाऱ्या भाविकांच्या स्नानाची सोय व्हावी, यासाठी उजनी धरणातून ३ हजार क्युसेक्स पाणी भीमा नदीमध्ये सोडण्यात आले असून, हे पाणी चंद्रभागा नदीपात्रामध्ये दाखल झाले आहे. यामुळे वारकऱ्यांना स्नान करणे सोयीचे झाले आहे.
सोलापूर जिल्ह्याच्या सरहद्दीवर पालखी सोहळा आल्यानंतर पंढरीत मोठ्या प्रमाणात वारकऱ्यांची गर्दी झाली होती. काही वारकरी आषाढी आधी पंढरीत येऊन स्नान व दर्शन करून वारीत जाण्यासाठी पालख्यांना सामोरे जात होते; मात्र चंद्रभागा वाळवंटात पाणीच नसल्याने डबक्यात साचलेल्या पाण्यामध्ये त्यांना स्नान करावे लागत होते. यामुळे प्रशासनाने बुधवारी उजनी धरणातून तीन हजार क्युसेक्स पाण्याचा विसर्ग भीमा नदीमध्ये सोडला असून, हे पाणी वाळू उपशाचे खड्डे व कोरड्या नदीतील भेगा भरत गुरसाळे, पंढरपूर बंधारा ओलांडून नवीन पूल, जुना दगडी पूल पार करून शनिवारी पहाटेच्या सुमारास चंद्रभागा वाळवंटात दाखल झाले आहे. यामुळे भाविकांना स्नान करणे सुलभ झाले असून, पाणी वाढत असल्याने होडीचालकांचीही मोठ्या प्रमाणात लगबग वाढली आहे.
चंद्रभागा नदीमध्ये पाणी नसल्याने वाळू उपसा मोठ्या प्रमाणात झाला आहे. यामुळे नदीपात्रामध्ये मोठमोठे खड्डे पडले आहेत. या खड्ड्यात पाणी साचणार असल्याने स्नानासाठी नदीपात्रात जाणाऱ्या भाविकांना खड्ड्याचा अंदाज येत नसल्याने धोका पत्करण्याची शक्यता नाकारता येत नाही. यामुळे प्रशासनाने पाणी येण्याआधीच वारकऱ्यांना याबाबत जनजागृती करण्याची गरज सध्या निर्माण झाली आहे.
---------------------
हळूहळू पाणी येऊ लागले
आठ ते दहा दिवसांपासून चंद्रभागा वाळवंटात पाणीच नव्हते. आता उजनीतून पाणी येत असून, हे पाणी पंढरपूर बंधाऱ्यातून हळूहळू सोडण्यात येत आहे. यामुळे चंद्रभागा नदीपात्रामध्ये पडलेले खड्डे भरून हे पाणी गोपाळपूरच्या दिशेने पुढे सरकत असून, वाळवंटात असलेल्या होडी चालविण्यासाठी होडीचालकांची लगबग सुरू झाली आहे.

Web Title: Water in the Chandrabhag area