Simla chilli yields about one million in six months | सिमला मिरचीतून सहा महिन्यांत तब्बल दहा लाखांचे उत्पन्न  

सिमला मिरचीतून सहा महिन्यांत तब्बल दहा लाखांचे उत्पन्न  

ठळक मुद्दे- पाण्याचा वापर कमी प्रमाणात करून शेतीचे उत्पादन वाढविले- आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने शेतीत केले बदल- मजुरांवर मात करीत यंत्रसामुग्रीच्या माध्यमातून साधले जास्तीचे उत्पादन

अंबादास वायदंडे 
सुस्ते : सध्या शेतकरी आधुनिक पद्धतीने शेती करण्याकडे वळला   आहे़ कमी पाण्यात, कमी खर्चात आणि कमी कालावधीत जास्त उत्पन्न मिळविण्यासाठी धडपड सुरू आहे़ फुलचिंचोली (ता़ पंढरपूर) येथील नागेश ज्ञानोबा जाधव यांनी शेडनेट उभारले आणि ते त्यांना फायदेशीर ठरले़ कारण या शेडनेटमधील सिमला मिरचीतून सहा महिन्यांत तब्बल दहा लाखांचे उत्पन्न   मिळाल्याचे ते सांगत होते़
नागेश जाधव यांनी भाऊ संतोष जाधव यांना बरोबर घेऊन शेतकºयांच्या विहिरी फोडण्याचे काम करत होते. यातून त्यांनी फुलचिंचोली हद्दीत तीन एकर जमीन खरेदी केली. या शेतीत २०१४-१५ साली एका एकरात ५ लाख रुपये खर्चून शेडनेट उभारले़ तेव्हापासून दरवर्षी काकडी, सिमला मिरची अशी पिके घेत लाखो रुपयांचे उत्पन्न मिळविले आहे.

नागेश जाधव हे वडील ज्ञानोबा जाधव, भाऊ संतोष जाधव, पत्नी स्वाती जाधव, भावजयी सुलभा जाधव यांच्या सहकार्याने शेतात वेगवेगळे प्रयोग करीत आहेत़ शिवाय त्यासाठी योग्य व्यवस्थापनही करतो़ यावर्षी शेडनेटमध्ये मशागत केल्यानंतर पाच ट्रॉली शेणखत व रासायनिक खते टाकली़ पाच फूट अंतरावर बोद सोडून झाल्यानंतर ठिबक सिंचनद्वारे तीन तास पाणी देऊन ते भिजवून घेतले़ नंतर सव्वा फूट अंतरावर सिमला मिरची रोपांची लागवड केली. लागवडीपासून पाच दिवसांनी बुरशीनाशक फवारणी केली़ अशा पद्धतीने नियोजन केले़ केवळ दीड महिन्यांनंतर त्याचे उत्पादन सुरू झाल्याचे नागेश जाधव यांनी सांगितले.

सिमला मिरचीचे एकूण १३ टन उत्पादन निघाले असून, किलोस २२ ते ३२ रुपयांप्रमाणे दर मिळाला आहे. यापासून दोन महिन्यांत ३ लाख ५० हजार रुपये उत्पन्न मिळाले आहे. पुढील काळात आणखी ७ लाख ५० हजार रुपये उत्पन्न निघणे अपेक्षित आहे, असे त्यांनी सांगितले.

शेतीत कष्ट केल्यास उत्पन्न मिळतेच
- धनाजी जाधव हे शेतात वेगवेगळे प्रयोग घेऊन त्यापासून भरपूर उत्पन्न घेत होते़ त्यांच्याप्रमाणे आपणही शेती केली पाहिजे म्हणून एका एकरात शेडनेटची उभारणी केली. त्यामध्ये काकडी व सिमला मिरची यांसारखी पिके लावून कमी दिवसात, कमी पाण्यात व जास्त नफा मिळवून देणाºया पिकांचा प्रयोग केला. शेतीमध्ये प्रामाणिकपणे कष्ट केल्यास निश्चितच जास्त उत्पन्न मिळते, असे नागेश जाधव यांनी सांगितले़ 


 

Web Title: Simla chilli yields about one million in six months

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.