आयपीएलच्या इतिहासात अनेक रोमांचक किस्से घडले आहेत, मात्र क्रिकेट जगताला हादरवून टाकणारा एक खुलासा नुकताच समोर आला आहे. 'युनिव्हर्स बॉस' म्हणून ओळखला जाणारा वेस्ट इंडिजचा स्फोटक फलंदाज ख्रिस गेल याच्या आयुष्यात असाही एक काळ होता, जेव्हा तो प्रचंड आर्थिक अडचणीत सापडला होता. २०११ च्या आयपीएल लिलावात कोणीही बोली न लावल्याने ख्रिस गेल इतका हतबल झाला होता की, त्याने थेट आयपीएलचे माजी अध्यक्ष ललित मोदी यांना फोन करून मदतीची याचना केली होती.
काय होता तो धक्कादायक फोन कॉल?
ललित मोदी यांनी मायकेल वॉनसोबतच्या 'द ओव्हरलॅप क्रिकेट' पॉडकास्टमध्ये या घटनेचा उलगडा केला. २०११ मध्ये ख्रिस गेल अनसोल्ड राहिल्याने प्रचंड नाराज झाला होता. त्याने मोदींना फोन करून आपली व्यथा मांडली होती. मोदींच्या म्हणण्यानुसार, गेल म्हणाला होता की, "ललित, माझ्यावर प्रचंड कर्ज आहे. मला माझे बिलं भरायचे आहेत. मला आयपीएलमध्ये खेळण्याची खूप गरज आहे, प्लीज काहीतरी करा."
फ्रँचायझींनी फिरवली होती पाठ
ख्रिस गेलची ही हताशा पाहिल्यानंतर ललित मोदी यांनी अनेक आयपीएल फ्रँचायझींना फोन करून त्याला संघात घेण्याची विनंती केली होती. मात्र, आश्चर्य म्हणजे त्या वेळी एकही संघ मालक किंवा फ्रँचायझी ख्रिस गेलला आपल्या संघात घेण्यास तयार नव्हती. सर्वच ठिकाणी मोदींच्या पदरी नकार आला होता.
विजय माल्याने दाखवला विश्वास
शेवटी ललित मोदी यांनी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचे तत्कालीन मालक विजय माल्या यांना फोन केला. मोदींनी माल्यांना पटवून दिले की, "या खेळाडूला संधी द्या, तुमच्या संघात एक जागा रिक्त आहे." ललित मोदींच्या आग्रहाखातर विजय माल्या यांनी गेलला आरसीबीमध्ये घेण्यास मान्यता दिली.
आणि मग इतिहास घडला...
विजय माल्यांच्या एका निर्णयाने केवळ ख्रिस गेलचे करिअरच सावरले नाही, तर आयपीएलच्या इतिहासाला नवी कलाटणी मिळाली. आरसीबीमध्ये प्रवेश केल्यानंतर ख्रिस गेलने आपल्या बॅटने मैदानावर अक्षरशः आग ओकली. त्याने अनेक रेकॉर्डब्रेक खेळी खेळल्या, ज्यात पुणे वॉरियर्सविरुद्धच्या ऐतिहासिक १७५* धावांच्या खेळीचा समावेश आहे. आर्थिक विवंचनेतून सावरलेला हा 'युनिव्हर्स बॉस' पुढे आरसीबीचा सर्वात मोठा मॅचविनर ठरला.