राजेशचे धड, दोन हात-पाय, मुंडके शवागारात मिळाले, कांबळे हत्या प्रकरणात फौजदाराने नोंदवली साक्ष
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2025 19:10 IST2025-11-20T19:10:12+5:302025-11-20T19:10:47+5:30
Maharashtra Crime News: साक्षीदार नाझिया चौधरी हिने आपल्या साक्षीत आरोपी बंटी ऊर्फ संजय हा तिच्या घराशेजारी राहत होता, ११ जून २०१९ रोजी आरोपी बंटी यांच्या घरातून घाण वास येत असल्याचे नमूद केले.

राजेशचे धड, दोन हात-पाय, मुंडके शवागारात मिळाले, कांबळे हत्या प्रकरणात फौजदाराने नोंदवली साक्ष
Solapur Crime : अॅड. राजेश कांबळे खून खटल्यास बुधवारी पुन्हा प्रारंभ झाला. कांबळे यांच्या खूनप्रकरणी संजय ऊर्फ बंटी खरटमल, अॅड. सुरेश चव्हाण आणि श्रीनिवास महांकाळी येलदी यांच्यावर भरलेल्या खटल्याची सुनावणी जिल्हा व सत्र न्यायाधीश जे. जे. मोहिते यांच्यासमोर सुरू झाली. यात दोघांच्या महत्त्वपूर्ण साक्षी नोंदवण्यात आल्या.
फौजदार संजय राठोड यांनी शवागृहातील पंचनाम्यात मयत राजेशचे धड, दोन हात, दोन पाय अन् मुंडके होते, असे सांक्षीत नमूद केले.
बुधवारच्या सुनावणीमध्ये साक्षीदार नाझिया चौधरी हिने आपल्या साक्षीत आरोपी बंटी ऊर्फ संजय हा तिच्या घराशेजारी राहत होता, ११ जून २०१९ रोजी आरोपी बंटी यांच्या घरातून घाण वास येत असल्याचे नमूद केले.
साक्षीदार फौजदार संजय राठोड यांनी आपल्या साक्षीत मयत राजेश कांबळे यांच्या मरणोत्तर पंचनामा हा सिव्हिल हॉस्पिटल येथील शवागृहामध्ये केला, तेथे मयताचे धड, दोन हात, दोन पाय व मुंडके होते, तसेच कपडे जप्तीचा पंचनामा दोन पंचांसमक्ष केल्याचे सांगितले.
लपवलेली गाडी अन् चावी काढून दिली
आरोपी बंटी खरटमल याने मयत राजेश कांबळे यांची गाडी अक्कलकोट स्टेशन येथे लपवून ठेवली आहे व गाडीची चावी जेथे फेकून दिली आहे ते ठिकाण दाखवतो, असे निवेदन दिले.
ते दोन पंचांसमक्ष नोंदविले. त्यानंतर आरोपी बंटी खरटमल हा जसा मार्ग सांगेल त्याप्रमाणे त्याच्यासोबत पोलिस व दोन पंच अक्कलकोट रेल्वे स्टेशन येथे गेले.
तेथून त्याने लपवलेली ज्युपिटर गाडी व चावी काढून दिल्याची साक्ष फौजदार संजय राठोड यांनी न्यायालयासमोर नोंदवली. त्यावर आरोपींच्या वकिलांनी घेतलेल्या उलट तपासास साक्षीदारांनी नकारात्मक उत्तरे दिली.