धोकादायक इमारतींमध्ये भाविकांचा भरणा

By Admin | Updated: July 8, 2014 01:12 IST2014-07-08T01:12:56+5:302014-07-08T01:12:56+5:30

प्रशासनाचे दुर्लक्ष; भाविकांच्या जीवाला धोक्याची शक्यता

Payment of devotees to dangerous buildings | धोकादायक इमारतींमध्ये भाविकांचा भरणा

धोकादायक इमारतींमध्ये भाविकांचा भरणा

पंढरपूर: पंढरपूर शहरात मोठ्या प्रमाणात धोकादायक इमारती असून, यांची संख्या पाचशेच्या वर आहे. याबाबत मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल झाली असतानाही प्रशासनाने याकडे कानाडोळा केला आहे. यामुळे सध्या इमारत मालक बाहेरून आलेल्या वारकऱ्यांना वास्तव्य देत असल्याने भाविकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे.
पंढरपुरात मंदिर परिसरासह अनेक गल्ली-बोळांमध्ये मोठ्या प्रमाणात धोकादायक इमारती आहेत. यामध्ये घरापासून ते मठ, धर्मशाळा, वाड्याचा समावेश असला तरी यात मोठ्या प्रमाणात महाराजांचे वाडे अधिक आहेत. पंढरपूर नगरपालिकेने या धोकादायक इमारत मालकांना सूचना देऊन पाडण्याचे आवाहन केले आहे; मात्र मालकांनी याकडे दुर्लक्ष केले असून, यामुळे पंढरीत धोकादायक असलेल्या अनेक इमारती तशाच आहेत.
सध्या वारीत मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी होत असल्याने बिनदिक्कतपणे वारकऱ्यांना यामध्ये राहण्यासाठी जागा दिली जात आहे. यामुळे वास्तव्य करणाऱ्या वारकऱ्यांसाठी या इमारती धोकादायक बनल्या आहेत. नगरपालिका प्रशासनाने धोकादायक इमारती जाहीर करून त्यावर इमारत धोकादायक असल्याबाबत सूचनाही त्या इमारतीवर लिहिल्या आहेत; मात्र असे असतानाही ऊन, वारा व पावसापासून बचाव करण्यासाठी वारकरी या इमारतींचा आधार घेत असून प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याने नगरपालिका प्रशासनाच्या कारभाराबाबत आश्चर्य व्यक्त होत आहे.
---------------------------------
पावसामुळे अधिक धोका
वारीच्या काळात सध्या पाऊस पडत असल्याने धोकादायक इमारती पडण्याची अधिक शक्यता आहे. यामुळे वारकऱ्यांसाठी या इमारतीमध्ये राहण्यापासून लांब ठेवण्यासाठी पंढरीत जनजागृती करण्याची गरज निर्माण झाली आहे.
 

Web Title: Payment of devotees to dangerous buildings